मालेगावः वारंवार होणारी वीज गुल, त्यात अचानक सुरू झालेले भारनियमन यामुळे मनमाडकर संतापले असून, त्यांनी बुधवारी रात्रीच पुणे-इंदूर महामार्गावर धाव घेत रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआयचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले. रात्री पावणेबारा ते बारापर्यंत हे आंदोलन सुरू होते. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. जेव्हा वीजपुरवठा सुरू करण्यात आला, तेव्हाच हे आंदोलन मागे घेण्यात आला. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यात विविध सण आणि उत्सव. त्यात महावितरणच्या सावळ्या गोंधळाने नागरिक आक्रमक होत आहेत. येणाऱ्या काळात हे भारनियमन असेच सुरू राहिले, तर पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आधीच थकबाकी वसुलीने मेटाकुटीला आलेल्या महावितरणसमोर आता नवीनच पेचप्रसंग उभा राहिलाय.
शिवसेना आणि भाजपमध्ये राज्यात सध्या आडवा विस्तू जाताना दिसत नाही. मात्र, इथे महावितरणच्या कारभाराविरोधात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते, नेते रस्त्यावर उतरलेच. सोबतच इतर सारेच राजकीय पक्ष या आंदोलनात सहभागी झाली. त्यामुळे लोकांत किती असंतोष आहे, हे समोर येत आहे. सध्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तोंडावर आलीय. त्याची तयारी अनेक ठिकाणी उत्साहात सुरू आहे. मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू आहेत. हिंदू धर्मियांमध्ये प्रभू रामचंद्रांचे नवरात्र सुरू आहे. या सणाच्या काळात भारनियमन होत असल्याने सर्व नागरिकांमध्ये टोकाचा संताप आहे.
शेकडो लोकांनी पुणे-इंदूर मार्गावर रात्री अचानक ठिय्या आंदोलन सुरू केल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत सुरू होत नाही, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे पोलिसांचीही कोंडी झाली. रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक तुंबली. शेवटी रात्री उशिरा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्यालाही पावणेबारा-बारा वाजले. तोपर्यंत आंदोलन सुरूच होते. भारनियमन सुरूच राहिले, तर आंदोलन तीव्र करू असा इशारा देण्यात आला आहे.