नाशिक : जिल्ह्यात बिबट्यांची मोठी दहशत आहे. गेल्या दोन दिवसात निफाड तालुक्यातील जळगाव येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सावजाच्या शोधात असलेले दोन बिबटे जेरबंद झाले आहेत. त्यामुळे कराड वस्तीवरली नागरिकांनी तसंच निफाडकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. (nashik nifad 2 leopard in 2 days in forest department net)
निफाड तालुक्यातील जळगाव येथील निफाड पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष कराड यांच्या वस्तीवर शेतमजूर शेताला पाणी देण्यासाठी गेला असता बिबट्याने या मजुराचा पाटलाग केला होता. दैव बलवत्तर म्हणून सदर बिबट्याच्या तावडीतून मजूर कसाबसा सुटला होता. दरम्यान याबाबत वन विभागाला कळवले असता त्यांनी कराड यांच्या शेतात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला. त्यामध्ये बुधवारी रात्री उशिरा एक तर गुरुवारी रात्री एक बिबट्या असे अंदाजे दीड ते दोन वर्षांचे दोन बिबटे जेरबंद झाले आहेत.
बुधवारी जेरबंद झालेला बिबट्या नर जातीचा आहे, तर गुरुवारी जेरबंद झालेला बिबट्या मादी जातीचा आहे. या बिबट्यांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर या बिबट्यांना पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार आहे.
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात बिबट्याचा चांगलाच धुमाकूळ सुरू आहे. अमझर येथील शेतकरी चिंतामण वाघमारे यांच्या 13 बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
गावानजीकच बिबट्याने बकऱ्यांवर हल्ला चढवला. त्या हल्ल्यात 13 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गावानजीक जंगल परिसर असल्याने बिबट्याचा सतत वावर आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. परिसरात वनविभागाने पिंजरा लावण्याची ग्रामस्थांनी मागणी केलीये.
नाशिक शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये बिबट्याचा बारमाही वावर असल्याचं पाहायला मिळतं. हरएक महिन्यात बिबट्याने हल्ला केल्याच्या बातम्या येतात. लोकवस्तीवर बिबट्याचा वावर वाढल्याचं पाहायला मिळतं. आता नागरिक त्रस्त झाले असून वन विभागाने आश्वासक पाऊल उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत.
(Nashik nifad 2 leopard in 2 days in forest department net)
हे ही वाचा :
नाशकात बिबट्याचा धुमाकूळ, 13 बकऱ्यांचा फडशा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण