नाशिकः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे नाशिकमध्ये (Nashik) 26 ते 28 एप्रिल दरम्यान ऑनलाइन (Online) पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे (Employment Fair) आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाइन रोजगार मेळाव्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे. जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता आहे. याकरीता नियोक्ते आणि नोकरी इचुछूक उमेदवारांसाठी ऑनलाइन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करून एका छत्राखाली ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मेळाव्यासाठीच्या मुलाखती या मोबाइल, दूरध्वनी, व्हिडिओ कॉन्फरन्स, स्काइप, व्हॉट्सअॅप इत्यादी माध्यमांद्वारे घेण्यात येणार आहेत.
कशी कराल नोंदणी?
ऑनलाइन रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी प्रत्येकाला नोंदणी करणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप सेवा योजना नोंदणी केली नसेल, त्यांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँण्ड्रॉइड मोबाइलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam हे ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी झाल्यानंतर उमेदवार पात्रतेनुसार रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.
जाहिरात प्रसिद्धी मोफत
उमेदवारांनी सादर केलेल्या पदानुसार आवश्यक कागदपत्रे व निकष पूर्ण करीत असल्यास त्या उमेदवारांची निवड नियुक्ती धारकांकडून भ्रमणध्वनीद्वारे मुलाखत घेवून करण्यात येणार आहे. भरती इच्छुक नियोक्त्यांनी महास्वयम वेब पोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फायर या ऑप्शनवर क्लिक करून नाशिक ऑनलाइन जॉब फायर -1 (2022-23) यावर जनरल, ईपीपी, ॲप्रटिंस आदी रिक्तपदे अधिसूचित करावी. तसेच सदर मनुष्यबळाच्या मागणीची जाहिरात व प्रसिद्धी विभागावरील वेबपोर्टलवर विनामूल्य करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क…
नियोक्ते व उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन रोजगार मेळाव्याचा भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेवून लाभ घ्यावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.
इतर बातम्याः