नाशिक – पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) जवळच असलेल्या उंबरखेड (Umbarkhed) गावालगत बिबट्याचा अनेक दिवसांपासून वावर होता. त्यामुळे तिथले स्थानिक शेतकरी अत्यंत भयभीत झाले होते. परिसरात बिबट्याचा सतत वावर असल्यामुळे शेतकरी तिकडे जायला सुध्दा घाबरत होते. तिथल्या एका शेतात बिबट्या आणि त्याची पिल्ली अनेक दिवसांपासून असल्याची माहिती शेतकऱ्यांनी वन विभागाला दिली. त्यानुसार वनविभागाने सापळा लावून बिबट्याला (Leopard) पिंजऱ्यात जेरबंद केलं. बिबट्याला जेरबंद केल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. कारण अनेक दिवसांपासून त्या परिसरात कोणालाही जाता येत नव्हतं. तसेच दोन बछड्यांचा वनविभागाकडून शोध सुरू आहे.
विवेक बर्वे यांच्या शेतात बिबट्या असल्याचं अनेक शेतकऱ्यांनी पाहिलं होतं. एकाच जागी दिसून आल्याने शेतकऱ्यांच्या मनात एक प्रकारे भीती निर्माण झाली होती. तसेच बिबट्याच्या सोबत त्याचे दोन बछडे असल्याने तो तिथून जाणार नाही याची शेतकऱ्यांना खात्री झाली. त्याअनुशंगाने शेतकऱ्यांनी ही बातमी वनविभागाच्या कानावर घातली. ऊसाचं शेत असल्यानं बिबट्याला जेरबंद करणं सोप्प नव्हतं. परंतु वनविभागाच्या चांगल्या कामगिरीमुळे बिबट्याला सकाळच्या सुमारास पकडण्यात यश आले.
आठ दिवसांपासून उसाच्या शेतात असलेल्या बिबट्यासोबत दोन बछडे असल्याची माहिती वन विभागाला शेतकऱ्यांनी दिली. बिबट्याच्या पाठीमागून दोन बछडे कायम फिरत होते. बिबट्या जेरबंद केल्यानंतर त्याची बछडी सुध्दा तिथेच असणार त्यामुळे वनविभाग दोन बछड्यांचा शोध घेत आहे.