नाशिक : नाशिक शहरासह ग्रामीण भागात सर्रासपणे गुटखा (Gutkha) विक्री होत असल्याची जोरदार चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक येथे असलेल्या अन्न व औषध प्रशासनाची (FDA) आणि शहराचे पोलीस आयुक्त (Nashik Police) यांच्यात बैठक पार पडली होती. त्यानुसार विविध ठिकाणची गोपनीय माहितीच्या आधारावर शहरात सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर नियंत्रण मिळवण्याची योजना आखण्यात आली होती. अवैध अमली पदारथी विक्री आणि वाहतूक विरोधी कठोर पाऊले उचलण्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली होती. त्यानंतर नाशिकच्या नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एका मोठ्या व्यापऱ्याच्या गोडाऊनवर छापा टाकला आहे. त्यात लाखों रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून चार तास झाले कारवाई सुरूच आहे.
नाशिक रोड सुभाष रोड परिसरातील लोहिया ट्रेडर्स यांच्या दोन गोडाऊन वर नाशिकरोड पोलीस व अन्न औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई केली आहे.
जवळपास दोन गोडाऊनमधून तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून व्यापाऱ्याला पथकाने ताब्यात घेतले आहे.
लोहिया ट्रेडर्स यांचे अजून एक मोठे गोडाऊन असून ज्यामध्ये अवैध गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून तिसऱ्या गोडाऊन कडे आणखी पथक रवाना झाले आहे.
अन्न व औषध प्रशासन आणि शहर पोलीसांच्या संयुक्त कारवाईने अवैध गुटखा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले असून मोठी खळबळ उडाली आहे.
त्यातच लोहिया ट्रेडर्स सारखा मोठा मासा पथकाच्या गळला लागल्याने किरकोळ विक्रेते देखील धास्तावले असून शहरात या गुटखा कारवाईवरुन मोठी चर्चा सुरू झाली आहे.