नाशिकः नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांच्या भोंग्याच्या आदेशानंतर वाद उदभवण्याची चिन्हे आहेत. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली आहे. त्यांनी आम्हाला पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्यापेक्षा राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आदेश महत्वाचा असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे पोलीस (Police) आयुक्तांच्या आदेशात अजानच्या आधी 15 मिनिटे आणि नंतर 15 मिनिटे हनुमान चालीसा, भजन म्हणण्यासाठी परवानगी देणार नसल्याचे म्हटले आहे. यावरून पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. खरे तर मुंबई महापालिकेच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी एकेक मुद्दा लावून धरलाय. त्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची जणू स्पर्धाच लागलीय. या धबडग्यात राज ठाकरे यांनी पाडव्याच्या शिवतीर्थावरील सभेनंतर हिंदुत्वाची शाल अंगावर पांघरलीय. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले आहे.
नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंग्यावरून सामाजिक वातावरण ढवळून निघू नये म्हणून काही आदेश दिलेत. त्याचीच अंमलबजावणी राज्य सरकार करण्याचा विचार करते आहे. या आदेशात म्हटले आहे की, कोणत्याही धार्मिक स्थळावर आणि इतर ठिकाणी भोंगे लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी तुम्हाला 3 मे पर्यंत अर्ज करता येईल. मात्र, अजानच्या आधी आणि नंतर 15 मिनिटे काहीही म्हणायला परवानगी दिली जाणार नाही. मशिदीच्या 100 मीटरच्या आत प्रवेश दिला जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. ध्वनीप्रदूषण पातळीच्या नियमाचे पालन करावे. अन्यथा कायदा मोडणाऱ्यांवर 4 महिने ते 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. त्यात दंड वेगळा असेल. तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तडीपारी होऊ शकते. 6 महिन्यांसाठी अटक होऊ शकते.
पोलीस आयुक्तांच्या भूमिकेनंतर नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पोलीस आयुक्तांपेक्षा आम्हाला राज ठाकरे यांचा आदेश महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. रमजान संपल्यानंतर म्हणजेच 3 मे नंतर मशिदीवर भोंगे राहिले, तर अजानच्या दुप्पट आवाजात मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू, असा इशारा दिला आहे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी भोंगे हटवण्यासाठी वारंवार सांगितले. तोच निर्धार राज साहेबांनी केला. त्यासाठी बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे आम्हाला तुरुंगात टाकणार असतील, तर तुरुंगवास भोगू, असा इशारा दिला आहे.
Maharashtra | Permission has to be taken for playing Hanuman Chalisa or Bhajan. It will not be allowed within 15 minutes before and after the Azan. It will not be allowed within 100 metres of the mosque. The aim of this order is to maintain law & order: Deepak Pandey, Nashik CP pic.twitter.com/zRrnyHdMqq
— ANI (@ANI) April 18, 2022
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आदेशात अजानच्या अगोदर व नंतर 15 मिनिटे काहीही म्हणायला परवानगी देणार नाही, असे म्हटले आहे. त्यात अलबतच हनुमान चालीसाही आली. यावरूनही मनसे आक्रमक झालीयच. शिवाय इतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात मशिदीच्या शंभर मीटरच्या आवारात प्रवेशही बंद आहे. यावरून पुन्हा एकदा वातावरण पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. येणाऱ्या काळात मुंबई, नाशिकसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्याच्या तोंडावर ही राजकीय चढाओढ सुरू झालेली दिसतेय.