नाशिकः नाशिकचे (Nashik) पोलीस आयुक्त (Police Commissioner) दीपक पांडेय यांच्यावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे विनाकारण बेताल आणि तथ्यहीन वक्तव्य करून महसूल आणि पोलीस विभागातील समन्वय बिघडवीत आहेत, अशी तक्रारही यावेळी करण्यात आली. पोलीस आयुक्त पांडेय यांनी पोलीस महासंचालकांना एक सनसनाटी पत्र पाठवले आहे. त्यात महसूल अधिकारी (Revenue Officer) ‘आरडीएक्स’, तर दंडाधिकारी डिटोनेटर बनत आहेत. त्यामुळे जिवंत बॉम्ब तयार होत आहेत. जिल्ह्यात भूमाफियांनी सर्वसामान्यांची अक्षरशः लूट सुरू केलीय. महसूल अधिकारी त्यांच्या बाजूने आहेत. या भूमाफियांपासून नागरिकांना अभय मिळावे म्हणून महसूल दंडाधिकारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकार आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे अधिकार पोलीस आयुक्तांकडे द्यावेत, अशी मागणी केली होती. त्यामुळे जिल्ह्यात अचानक पोलीस विरुद्ध महसूल असा संघर्ष निर्माण झाला आहे.
तहसीलदार संघटनेकडून निषेध
पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या पत्राचा तहसीलदार संघटनेने निषेध नोंदवला. त्याबद्दल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही तक्रार आणि नाराजी व्यक्त केली. पांडेय यांनी काहीही कारण नसताना महसूल विभागाची जाहीर बदनामी केलीय. त्यामुळे त्यांनी संपूर्ण महसूल विभागाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. संघटनेने विभागीय आयुक्तांना एक निवेदन देत पोलीस आयुक्त पांडेय यांच्यावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई नाही केल्यास 11 एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेचे उपाध्यक्ष कैलास देवरे, सहसचिव शशिकांत मंगरुळे, सचिव बाळासाहेब वाकचौरे, कार्याध्यक्ष सुरेश बगळे आणि इतर तहसीलदार उपस्थित होते.
पांडेय भूमिकेवर ठाम
पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या सनसनाटी पत्रावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पांडेय यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पांडेय यांनी महसूल मंत्र्यांची सपशेल माफीही मागितली आहे. थोरात सुजाण आणि चांगले मंत्री आहेत. त्यांना पत्रातील भाषा चुकीची वाटत असेल, तर मी माफी मागतो. या पत्रातून कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता. फक्त दोनशे वर्षांपासून सुरू असलेल्या त्रुटी दूर करण्याचा हेतू आहे. मी महसूल विभागाच्या विरोधात नाही. या विभागाचे राज्याच्या विकासात मोठे योगदान आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
इतर बातम्याः