मालेगाव : मालेगाव (Malegao) तहसील कार्यालयात प्रहार संघटनेने रेशन कार्डसाठी जोरदार आंदोलन केले. तालुक्यातील ग्रामस्थांसाठी रेशन कार्ड (Ration card) तयार करून मिळावे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महसूल विभागाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. अनेक दिवसांपासून ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना रेशन कार्ड मिळाले नाहीयं. त्यामुळे मोफत धान्याचा लाभ मिळत नसल्याने अनेकदा पाठपुरावा करून देखील रेशन कार्ड मिळत नसल्याची तक्रार (Complaint) आदिवासी बांधव करत आहे. मात्र, प्रशासनाकडून त्यांना कोणतीही दाद मिळत नाहीयं.
रेशन कार्ड तयार करून देण्याच्या शिबिरात तहसीलदार आणि नायब तहसीलदार गैरहजर राहिल्याने मोठा गोंधळ उडाला. प्रहारचे तालुकाध्यक्ष शेखर पगार यांनी तहसीलदार चंद्रजित सिंग राजपूत यांची खुर्ची जमा करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर सोमवारी मालेगाव तहसील कार्यालयात रेशनकार्ड शिबिराच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या शिबिराला स्वत: तहसीलदार व नायब तहसीलदार गैरहजर होते. यामुळे रेशन कार्डचे वाटप म्हणावे तसे करण्यात आले नाही.
तालुक्यातील ग्रामस्थांना रेशनकार्ड मिळावे यासाठी झोडगे, माणके, घाणेगाव, कौळाणे, कंधाणे, पळासदरे, गुगुळवाड, रोंझाणे सिताणे, अंजदे, उंबरदे, दहिवाळ गिगाव, चिंचगव्हाण, आघार, वडेल, चिंचावड, कांक्रारे आदी गावांचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनानंतर महसुल प्रशासनाला जाग येईल आणि लोकांना लवकर रेशन कार्ड मिळतील अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली. या आंदोलनामुळे संपूर्ण तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती.