चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नाशिक | 14 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे. उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. कालच भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर झाली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं आहेत. मात्र या सगळ्यात महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. अशात नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत संघर्ष पाहायला मिळतोय. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी नाशिकच्या जागेवर दावा करत आहेत. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाशकात आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना राऊतांनी या जागेवर दावा सांगितला आहे. नाशिकची जागा शिवसेना जिंकणार, असं राऊत म्हणालेत.
अजित पवार गटाचे नेते निलेश लंके हे आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यावरही राऊतांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे सगळ्यांचे छत्र आहे. निलेश लंके कुठे गेलेच नव्हते. कालच मला समजले मी आणि पवार साहेब व्यासपीठावर होतो. निलेश लंके यांच्याशी माझी या विषयावर एकदा चर्चा झाली आहे. घर वापसीपेक्षा शरद पवार हे सगळ्यांचे छत्र आहे. ते पुन्हा इथे येऊन लोकसभा लढणार असतील तर महाराष्ट्र त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करेल, असं राऊत म्हणाले.
भाजपची काल दुसरी उमेदवार यादी जाहीर झाली. यात केंद्रशासित प्रदेशातील दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातच्या ठाकरे गटाच्या खासदार कलाबेन डेलकर यांनी उमेदवारी देण्यात आली. यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. कलाबेन डेलकर यांचे नाव भाजपच्या यादीत असलं तरी ती जागा शिवसेनेची आहे. आम्हीच ती जागा जिंकू, असं संजय राऊत म्हणाले.
महविकास आघाडी असेल किंवा इंडिया सगळे एक आहोत. राहुल गांधी यांचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. नंदुरबार धुळे आणि आज नाशिकच्या चांदवडमध्ये ते येत आहेत. सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्षांना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं ठरवलं आहे. 17 तारखेला शिवाजी पार्कला काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा समारोप होईल. स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची काल चर्चा झाली. उद्धवजींना खास आमंत्रण राहुल गांधींनी दिलं आहे. शिवसेना फार मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करत आहे, असं संजय राऊत म्हणाले.