नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) गुरुवारी शिवसेनेने (Shivsena) केलेले एक अनोखे आंदोलन आणि रडारडी चांगलीच चर्चेत राहिली. भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाला शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील कलगीतुरा आता टिपेला पोहचला आहे. राऊत यांच्या मालमत्तांवर टाच आणल्यानंतर ते चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी नुकतीच सोमय्यांना कशी लाखोली वाहिली ते उभ्या महाराष्ट्राने टीव्हीवरून बीप-बीप करून ऐकले. तितकाच टोकाचा विरोध आता शिवसैनिकही करतायत. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली सोमय्यांनी 58 कोटी रुपये हडपल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. याच प्रकरणी सोमय्यांचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आले.
नाशिकमधील शालिमार भागात शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे. येथेच सोमय्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यासाठी एक तिरडी बांधण्यात आली. गाडग्यात पेटलेल्या गोवऱ्या ठेवून शिकाळे तयार करण्यात आले. प्रतिकात्मक अंत्ययात्रेची सारी तयारी झाली. त्यानंतर शिवसैनिकांनी धाय मोकलून उर पिटून मोठ्याने रडारडी केली. ही अचानक सुरू झालेली रडारडी पाहून रस्त्यावरून जा-ये करणारे अनेक पादचारी आणि वाहनचालक क्षणभर थबकले. खरेच कोणी गेले की काय, याचीही अनेकांनी चौकशी केली. मात्र, हे आंदोलन असल्याचे समजताच अनेकांनी सुटकेचा निश्वासही सोडला. मात्र, या आंदोलनाची चांगलीच चर्चा यावेळी झाली.
आयएनएस विक्रांतप्रकरणी जमविलेला निधी हडपल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांना अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही शिवसेना कार्यकर्त्यांनी यावेळी केली. विशेष म्हणजे या आंदोलनाला महिला आंदोलकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिवसेनेच्या वतीने आज राज्यभर सोमय्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. आता भाजप याप्रकरणी काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.
नाशिक महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. सध्या येथे भाजपची सत्ता होती. आता येणाऱ्या निवडणुकीतही भाजप विरुद्ध शिवसेना अशीच लढत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घटनेचे पडसाद नाशिकमध्ये उमटताना दिसत आहेत.