बोला आता, स्वतःच्याच गावात खासदारालाच गावबंदी; ‘ते’ पोस्टर राज्यात का होतंय व्हायरल

| Updated on: Nov 28, 2024 | 10:07 AM

MP Ban in Village Nashik : राज्यात विधानसभा निवडणुकीतील वाद-विवादाचे पडसाद अजूनही त्या त्या मतदारसंघात उमटत आहेत. त्यातूनच नाशिक जिल्ह्यातील राजकारण पण ढवळून निघाले आहे. या जिल्ह्यात एका खासदारालाच काही गावांमध्ये बंदीचे पोस्टर झळकले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बोला आता, स्वतःच्याच गावात खासदारालाच गावबंदी; ते पोस्टर राज्यात का होतंय व्हायरल
खासदारांनाच गावबंदी
Follow us on

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकला. तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. काही ठिकाणच्या निकालावरून अजूनही वाद-विवाद सुरू आहेत. निवडणुका संपल्या तरी निकालाचे मंथन गल्ली-गल्लीत, पारा-पारावर, चौका-चौकातून सुरू आहे. त्यावरून काही ठिकाणी वादाचे प्रसंग ओढावले आहेत. काहींना दुसऱ्या उमेदवाराचा विजय तर काहींना आपल्या उमेदवाराचा पराभव जिव्हारी लागला आहे. त्याला नाशिक जिल्हा सुद्धा अपवाद ठरला नाही. येथे तर एका खासदारालाच गावबंदी करण्यात आली. यासंबंधीचे पोस्टरच गावात झळकल्याने त्याची चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे. नेमका काय आहे हा प्रकार?

खासदारांना गावबंदी

खासदार राजाभाऊ वाजे यांना त्यांच्याच गावात गाव बंदी घातल्याचे समोर आले आहे. गद्दार खासदार पराग वाजे असा गाव बंदी बॅनरवर उल्लेख दिसत आहे. राजाभाऊ वाजे यांना त्यांच्या गावासह तीन ते चार गावांमध्ये गावबंदी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. खासदार राजाभाऊ वाजे आणि त्यांच्या कुटुंबियांना सिन्नर तालुक्यात ही गावबंदी करण्यात आली आहे.
महायुतीचे उमेदवार माणिकराव कोकाटे त्यांच्या बॅनरवर राजाभाऊ वाजे यांचे फोटो झळकल्याने हा वाद ओढवल्याची चर्चा होत आहे. महाविकास आघाडीत असताना महायुतीकडून काम केल्याचा आरोप करत त्यांना गावबंदी घालण्यात आल्याचे समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

राजाभाऊ वाजे यांना गावबंदीचा फलक

सिन्नरमध्ये घड्याळाचा गजर

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघात काय होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. भाजप आणि छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात सुरूंग लावण्यासाठी महाविकास आघाडीने मोठी फिल्डिंग लावली होती. पण या सर्व प्रयत्नांवर सिन्नर मतदारसंघात पाणी फेरले गेले. इथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सत्तास्थानाला काही धक्का देता आला नाही. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उदय सांगळे यांची तुतारी काही वाजली नाही. महाविकास आघाडीच्या समर्थकांना हे गणित काही पचनी पडले नाही.

गावातील ज्येष्ठांचा वेळीच हस्तक्षेप

महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे पाठबळ आपल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळाले नाही, असा समज काही जणांनी केला. त्यांनी लागलीच त्यांच्या भावना या बॅनरद्वारे झळकावल्या. त्यात उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे आणि त्यांच्या कुटुंबियांना थेट गावबंदी करण्यात आली. त्यांच्यासह कुटुंबियांना गावात प्रवेश देण्यास मनाई आहे, असा फलक झळकला. यावरून नवीन वाद उफाळण्याची शक्यता लक्षात घेत, गावातील ज्येष्ठांनी लागलीच पुढाकार घेत हे बॅनर हटवल्याची माहिती समोर येत आहे.