नाशिकः मासिक पाळी (Menstrual Cycle) सुरु असलेल्या विद्यार्थिनीला (School Girl) वृक्षारोपण करू नको, असं एका शिक्षकाने म्हटल्याने नाशिकमध्ये सध्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील त्र्यंबक देवागाव आश्रम शाळेत (Devagaon Ashram School) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पावसाळ्यात येथील कन्या आश्रम शाळेतील विद्यार्थिनींकडून परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र एका विद्यार्थिनीला शिक्षकांनी झाड लावण्यापासून रोखले. तुझी पाळी सुरु आहे. तू झाड लावलंस तर ते झाड मरेल, असा अजब तर्क या शिक्षकाने लावला. तसे कारण सांगून विद्यार्थिनीला बाजूला ठेवले. घडल्या प्रकाराचा संताप आल्याने सदर विद्यार्थिनीने घरी पालकांना हा किस्सा सांगितला. त्यानंतर पीडित मुलीने पालकांच्या सांगण्यावरून आदिवासी विकास विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश अप्पर आयुक्तांनी दिले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील देवगाव शासकीय कन्या आश्रम शाळा येथील शिक्षकाने एका विद्यार्थिनीला मासिक पाळी आल्यामुळे वृक्षारोपण करण्यास मनाई केल्याची घटना घडल्याचे समाजमाध्यमाद्वारे निदर्शनास आले. pic.twitter.com/SYyyYdNQ3U
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) July 26, 2022
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक देवागाव आश्रम शाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे. येथील मुलीने केलेल्या तक्रारीनुसार, साधारण दहा ते पंधरा दिवसांपूर्वी शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीला असं बोलल्याचा प्रसंग घडला. शाळेतील विद्यार्थिनींमध्ये शिक्षकाने सरळ सूचना केली. ज्यांची मासिक पाळी सुरु असेल त्या विद्यार्थिनीने झाड लावू नये. नाही तर हे झाड जळून जाईल….या वक्तव्यामुळे विद्यार्थिनीला प्रचंड राग आला. सर तुम्ही असे कसे म्हणू शकता, असा प्रश्न विचारल्यावर, ‘तू कोण विचारणारी, उद्धट बोलते. लई शहाणी झालीस विचारणारी… असं वक्तव्य करून विद्यार्थिनीच्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं.
पाळीचा आणि वृक्षारोपणाचा काहीही संबंध नसताना केवळ अंधश्रद्धेपोटी शिक्षकाने अशा प्रकारे बाजूला ठेवल्याने विद्यार्थिनीने सदर प्रकाराची तक्रार घरच्यांकडे केली.
सदर विद्यार्थिनिने कुटुंबियांच्या सल्ल्यानुसार, श्रमजीवी संघटनेकडे तक्रार केली. त्यानंतर आयुक्तांकडे तक्रार देण्यासाठी गेले. आदिवासी विभागाकडे तक्रार केल्यानंतर सदर प्रकरणी सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश अप्पर आयुक्तांनी दिले.
नाशिकमधील सदर प्रकरणावर चहुबाजूंनी टीका होत आहे. मासिक पाळीमुळे वृक्षारोपणास मनाई करण्याच्या घटनेच्या चौकशीचे आदेश महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत. ही बाब अतिशय निंदनीय असून महराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून घटनेची गंभीर दखल घेतली आहे. वृक्षारोपणास मनाई करणाऱ्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोग कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.