राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणूक काळात तरूण नेत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकमध्ये मनसेच्या उमेदवारावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक जिल्हा सचिवाला मारहाण करत लुटल्याची तक्रार दाखल झाली आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार प्रसाद सानप यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मनसेचेच कार्यालयीन सचिव योगेश पाटील यांनी गुन्हा दाखल केला आहे. घरात घुसून चोरी केल्याचा आरोप प्रसाद सानप यांच्यावर योगेश पाटील यांनी केला आहे.
नाशिक पूर्वचे मनसेचे उमेदवार प्रसाद सानप यांनी मनसेचे पक्ष कार्यालयीन सचिव योगेश पाटील यांच्याकडे निवडणूक खर्चासाठी विशिष्ट रक्कम दिली होती. मात्र पक्ष कार्यालयीन सचिव योगेश पाटील यांनी निवडणूक खर्चासाठी दिलेली रक्कम वापरली नसल्याचा उमेदवार प्रसाद सानप यांचा आरोप आहे. हेच पैसे परत मागण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी गेलेल्या प्रसाद सानप आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चोरी केल्याचा आरोप करण्यात आलाय.
मनसेचे उमेदवार प्रसाद सानप यांच्यावर त्यांच्याच सहकाऱ्याने चोरीचा आरोप केला आहे. योगेश पाटील यांच्या घरात घुसून त्यांच्या घरातून 8 लाख 84 हजार रुपये रोख आणि योगेश पाटील यांच्या आईची अडीच तोळ्याची पोत चोरल्याचा आरोप केला गेला आहे. एकूण 9 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून नेल्याची पाटील यांची तक्रार आहे. याच तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी मनसेचे उमेदवार प्रसाद सानप यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
प्रसाद सानप हे मनसेचे नेते आहेत. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसेने त्यांना उमेदवारी दिली आहे. तरूण उमेदवार म्हणून स्थानिक लोक त्यांच्याकडे पाहत आहेत. तरूणांचे प्रश्न घेऊन ते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. असं असतानाच आता प्रसाद सानप यांच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. घरात घुसून चोरी केल्याचा आरोप प्रसाद सानप यांच्यावर मनसेच्याच नेत्याने केला आहे.