लासलगाव : लासलगावसह (Lasalgaon) परिसरातील निफाड, चांदवड, येवला, सिन्नर व कोपरगाव या तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो (Tomato) या पिकाची लागवड केलीयं. लासलगाव जरी कांद्यांसाठी प्रसिध्द असले तरी येथील शेतकऱ्यांनी कांद्यासोबतच टोमॅटोचे पीक घेतले आहे. टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड केली असल्याने त्यांची मालविक्रीची सोय व्हावी म्हणून आशिया खंडातील अग्रेसर बाजारपेठ (Market) म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आता टोमॅटोचा लिलाव देखील सुरू झालायं.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो लिलावाला शुभारंभ करण्यात आलायं. बाजार समितीत टोमॅटोचे विक्री उघड लिलावाद्वारे होत असून स्थानिक अडत्यांबरोबर अनेक परप्रांती व्यापारी लिलावात सहभाग घेत असल्याने स्पर्धात्मक लिलाव झाल्याने आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळते आहे. विक्री उघड लिलाव झाल्यामुळे एक स्पर्धा निर्माण झाली आणि याचा थेट फायदा हा शेतकऱ्यांना झालायं.
लिलावामध्ये शेतकऱ्यांना 20 किलोच्या टोमॅटो क्रेट्स कमाल 351 रुपये, किमान 50 रुपये तर सर्वसाधारण 300 रुपये इतका बाजार भाव मिळत आहे. टोमॅटो लिलावास शेतकरी अडते व व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने तसेच बाजारभाव ही चांगले असल्याने टोमॅटो उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण बघायला मिळते आहे. यामुळे आता कांद्यासोबतच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचा लिलाव देखील मोठ्या प्रमाणात होतोयं.
टोमॅटो उत्पादकांनी आपला टोमॅटो शेतीमाल योग्यप्रकारे निवड करून एक सारखा टोमॅटो 20 किलोच्या क्रेट्समध्ये विक्रीस आणल्यास त्यास जास्तीत जास्त बाजार भाव मिळेल असे आव्हान बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले आहे. टोमॅटो क्रेट्सला योग्य भाव मिळत असल्यामुळे नाशिक जिल्हातील शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.