मालेगाव : नाशिक (Nashik) जिल्हात दमदार पावसाने हजेरी लावलीयं. यानंतर नद्यांना पूर देखील आला. पावसामुळे आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, हरणबारी, केळझर ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. धरणांमधून केलेल्या पाण्याच्या विसर्गाने जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर (Flood) आल्याचे दिसून आले. नाशिकसह राज्यात यंदा उशीरा पण जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान (Damage) झाले. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील केरसाने गावातील रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे.
नाशिकच्या बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील दसाणे गावालगतच जंगलातील तसेच शेतातील पाण्याचा विसर्ग शेजारीच असलेल्या केरसाने येथील गावकऱ्यांनी रस्त्यावर बांध घालून पाणी अडवल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. काही शेतकऱ्यांच्या अडमुठ्यापणामुळे स्थानिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. या पाण्यातून ये-जा करणे देखील शक्य होत नसल्याने सटाणा आगाराने आपली बससेवा देखील बंद केलीयं.
सटाणा आगाराने बससेवा बंद केल्याने प्रवाशांचे तसेच शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असल्याचे समजते, त्यामुळे पाण्याचा विसर्ग होत नाही. मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होत असून संपूर्ण रस्ता जलमय झाला आहे. त्यामुळे पायी चालत जाणे अवघड झाले आहे. बस बंद असल्याने गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी शाळेत देखील गेले नाहीयंत. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.