यंदा पाऊस होऊनही येवल्यात पाण्यासाठी भटकंती सुरुच; पाण्याच्या टँकरसाठी महिलांचा टाहो…

| Updated on: Mar 30, 2022 | 5:18 PM

यंदा महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. तसाच पाऊस नाशिक जिल्ह्यातही झाला. जोरदार पाऊस होऊन शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसानही झाले मात्र मार्च महिन्याचा जसा कडाका वाढला तसा आता नाशिकमधील येवल्यात पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे, त्यापेक्षा भयानक अवस्था आता परिसरातील जनावरांची झाली आहे, त्यामुळे आता पाण्याच्या टँकरची मागणी होत आहे.

यंदा पाऊस होऊनही येवल्यात पाण्यासाठी भटकंती सुरुच; पाण्याच्या टँकरसाठी महिलांचा टाहो...
Image Credit source: TV9
Follow us on

नाशिक: यंदा अनेक भागात पाऊस झाला, तसा पाऊस नाशिक जिल्ह्यातही (Nashik District) झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पाणीमय झाले, त्या पाणीमय जिल्ह्यात नाशिक जिल्ह्याचाही समावेश होता. मात्र कितीही पाऊस पडला तरी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील निम्मे पाणी (Water Problem) वाहूनच जाते अशीच परिस्थिती सध्या येवले येथे झाली आहे. या वर्षीही चांगला पाऊस झाला, चांगला पाऊस झाल्याने या परिसरातील पिके अक्षरशः पाण्यात गेली, शेतीचे नुकसान झाले. मात्र उन्हाळा सुरू होताच पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर-पूर्व भागात पाणी टंचाईने डोके वर काढल्यामुळे आता पाण्यासाठी महिलांनी दोन-दोन किलो मीटरची भटकंती करावी लागत आहे. येवला परिसरातील पाणी समस्या तीव्र बनल्यानेच आता पाण्याच्या टँकरची (Water Tanker) मागणी करण्यात येत आहे.

उत्तर-पूर्व भागात अनेक गावात पाणी टंचाईची समस्या तीव्र बनली आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्यासाठी महिलांची भटंकती सुरु झाली आहे. ज्या प्रमाणे पाण्यासाठी माणसांना वणवण करावी लागत आहे त्यापेक्षा भयानक अवस्था येथील शेतकऱ्यांच्या जनावरांची झाली आहे. येवल्यात पाणी समस्या निर्माण झाल्यानंतर महिलांनी पाण्यासाठी भटकंती सुरु केली, मात्र आता कुठेच पाणी नसल्याने जनावरांना पाणी मिळावे म्हणून महिलांना दोन तीन किलोमीटर भटकंती करुन पाणी आणावे लागत आहे.


टँकरची मागणीसाठी पाच गावांचे प्रस्ताव

मार्च महिन्यामध्येच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने आता ज्या ज्या गावातून पाण्याची समस्या तीव्र बनली आहे, त्या गावांनी टँकरची मागणी केली आहे. सध्या पाण्यासाठी 5 गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे करण्यात आला आहे.

पाण्यासाठी महिलांची वणवण

पाणी समस्या तीव्र बनल्याने परिसरातील महिलांचे हाल होत आहेत. येथील महिला पाण्यासाठी दोन-तीन किलोमीटर भटकंती करतात. पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्या सांगतात की, घरात पाणी समस्या तीव्र बनल्याने दोन ते तीन किलोमीटरवरुन पाणी आणावे लागत आहे. शाळेला जाणाऱ्या मुलांना डबा करुन देणे, घरातील इतर कामं करणे आणि पुन्हा दिवस दिवसभर पाण्यासाठी भटकंती करायची यामुळे हाल होत असल्याचे सविता वैद्य यांनी सांगितले.

ऊसतोडीनंतर समस्या आणखी तीव्र

ममदापूर गावातील नागरिक ऊस तोडीच्या दिवसात महाराष्ट्रातील अनेक गावात स्थलांतर होतात. त्यामुळे ममदापूरमध्ये या काळात लोकसंख्या कमी असते, मात्र आता साखर कारखाने बंद होत आहेत. ममदापुरमधील नागरिक पुन्हा ज्यावेळी गावात येथील त्यावेळी मात्र गावात पाणी समस्या तीव्र बनेल असं मतही व्यक्त केले जात आहे. ममदापूर भागातील महिलांना एक ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याची वेळ येत आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील म्हणून भटकंती करण्याची वेळ या महिलांवर येत असल्याने गावमध्ये त्वरित पाण्याचा टँकर चालू करण्याची मागणी स्थानिक महिला करत आहेत.

विहिरींनी तळ गाठला

उत्तर पूर्व तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी महिलांची भटकंती सुरु आहे. सर्वच भागात पाणी टंचाई आहे, त्यामुळे कुपनलिकांवर पाण्यासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात येत आहे. मे महिन्याच्या आधीच पाण्याचे टँकर सुरु झाले तर मात्र उन्हाळ्यात महिलांचे होणारे हाल मिठणार असल्याचे मत दत्तात्रय वैद्य यांनी व्यक्त केले आहे.

टँकरच्या मंजूरीचे प्रस्ताव पाठवले

गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी सांगितले की, येवला तालुक्याच्या पूर्व भागातील 5 ग्रामपंचायतीचे पिण्याच्या पाण्याचा टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले आहेत. त्यामध्ये पहिला ममदापूर गावाचा प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. इतर प्रस्ताव तहसीलदारांकडे मंजुरीसाठी पाठवले असून त्यांच्याकडून मंजूर होऊन आल्यानंतर पाण्याचे टँकर सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Heat Wave : मध्य महाराष्ट्रासह राज्यात उष्णतेची लाट, चार दिवस उन्हाचे चटके, चंद्रपुरात रेकॉर्डब्रेक तापमान

त्यांना बेघर होऊ देऊ नका, रेल्वेमार्गालगच्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करा-मनोज कोटक

Mango Damage अवकाळीचं संकट वर्षभर राहिलं, यंदा आंबा फळपिकाचेही गणित बिघडलं