नाशिक : नाशिकमध्ये जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. 8 लाख रुपयांच्या लाच प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात लाचलूचपत प्रतिबंधक कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात शिक्षणाधिकारी वैशाली विर यांच्यासह प्राथमिक शिक्षक आणि शासकीय चालक आरोपी आहेत. प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते आणि शासकीय चालक ज्ञानेश्वर येवले यांना अटक करण्यात आलीय. शिक्षणाधिकारी वैशाली विर थोड्याच वेळात भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर होणार आहेत.
शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितली होती. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आलंय. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.
आरोपी शिक्षणाधिकाऱ्यांनी एका संस्था चालकांकडे सरकारकडून मिळणारं 20 टक्के अनुदान मंजूर करण्यासाठी ही लाच मागितली होती. संस्था मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरु करण्याच्या ऑर्डरची मागणी करत होती. ही ऑर्डर करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेकडून सुमारे 9 लाख रुपयांची लाच मागितली. यावेळी तक्रारदारांनी तडजोडीअंती 8 लाख रुपये देण्याचे कबूल केले. मंगळवारी (10 ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचला ठाणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचला.
यानंतर वीर यांच्या शासकीय वाहनावरील चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले याने तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारली. याचवेळी चालक येवले यास पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांचे नाव घेतले. त्यानंतर पथकाने तत्काळ थेट झनकर यांच्या दालनात जाऊन चौकशी केली.
या प्रकरणात वीर यांच्यासह वाहन चालक ज्ञानेश्वर येवले, प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते (राजेवाडी, ता. नाशिक) यांच्याविरूद्धही कारवाई केली. यानंतर पथक रात्री उशिरापर्यंत पथकाने झनकर यांची चौकशी केली. संपूर्ण कारवाई पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिराने त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याच आला. तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांना निलंबित करण्यात आल्यानंतर डॉ. वैशाली झनकर-वीर यांची सर्वप्रथम जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांची माध्यमिक शिक्षाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्या शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहत होत्या.