नाशिकः नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेतील (ZP) कारभाऱ्यांचा कार्यकाळ आज 20 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे येथेही प्रशासकीय राजवट लागू होणार आहे. जिल्हा परिषदेतील प्रशासकीय सूत्रे आता मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हाती जाणार आहेत. दुसरीकडे महापालिकेची (municipal corporation) निवडणूक (election) ठरलेल्या वेळेत होत नसल्याने तिथेही नगरविकास विभागाने प्रशासकाची नियुक्ती केलीय. महापालिकेवर प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त कैलास जाधव हे कामकाज पहात आहेत. प्रशासकीय राजवटीत महापालिकेत आयुक्त आणि जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे महत्त्व वाढणार असल्याने अप्रत्यक्षपणे सत्तेची खरी सूत्रे ही महाविकास आघाडी सरकारच्या हातात राहणार आहेत. तूर्तास तरी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या आहेत. मात्र, त्यानंतर तरी वेळेवर निवडणुका होतील, की पुन्हा दिवाळीपर्यंत प्रशासक राज काय राहील याची चर्चा सुरू आहे.
सदस्य संख्येमध्ये वाढ का?
नाशिक जिल्हा परिषदेचेही प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम सुरू होते. मात्र, ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुकाही लांबल्या आहेत. नाशिक शहरी भागासाठी 2 महापालिका, 8 नगरपालिका, 7 नगरपंचायती आहेत. मात्र, ग्रामीण भागाचा गावगाडा एकट्या जिल्हा परिषदेवर सुरू आहे. ग्रामीण भागात 2011 मधील जनगणनेनुसार 34 लाख 99 हजार 792 लोकसंख्या होती. त्यात साधरणतः पाच टक्के वाढ झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, मुलभूत सुविधा विकास कामे साऱ्यांची जबाबदारी ही वाढली. हे पाहता जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या वाढवण्यात आली आहे.
कुठे वाढले गट?
नव्या प्रभागरचनेनुसार यंदा जिल्ह्यात 73 गटांमध्ये 11 गटांची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या एकूण 84 गट आहेत. तर प्रत्येक गटात 2 गणांची वाढ झाली आहे. त्यामुळे 146 वरून गणांची संख्या आता 168 झाली आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव, नांदगाव, येवला, बागलाण तालुक्यांमध्ये गटांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसोबतच पंचायत समित्यांची निवडणूक होते. एका गटात दोन गण असतात. या दोन्ही निवडणुकांना वेगवेगळे मतदान करावे लागते. जिल्ह्यात ओझरची ग्रामपंचायत आता नगरपंचायत झाली आहे. त्यामुळे आपसुकच हा गट येणाऱ्या काळात रद्द होईल. मात्र, ही निवडणूक होणार कधी, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.