नाशिकमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवारांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचं इथं भलं झाल्याचं आपण पाहिलाय का? शेतमालाला भाव नाही, बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय. महिला सुरक्षेचा प्रश्न देशात मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. 2014 मध्ये मोदींनी सांगितलेले एकही गोष्ट त्यांनी दहा वर्षात पूर्ण केली नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलण्यापेक्षा मोदींनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हे बोलायला हवं होतं, असं रोहित पवार म्हणाले.
शरद पवारांच्या एका मुलाखतीतील विधानानंतर मित्र पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील का?, अशी चर्चा सुरु झाली आहे. यावर रोहित पवारांनी भाष्य केलंय. या निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांची अतिशय वाईट परिस्थिती होईल, याची नरेंद्र मोदींना भीती वाटतेय. सर्व्हेमध्ये भाजपची पीछेहाट होतानाच दिसतेय. सामान्य कुटुंबांना भाजपने अडचणीत आणलं, असं रोहित पवारांनी म्हटलं.
नरेंद्र मोदींच्या भाषणाची सुरुवात विकासावर केली. नंतर हिंदू मुस्लिमांवर आले. नंतर भटकती आत्मावर आले. नंतर अदानी अंबानीवर आले. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना ते आमच्याकडे या असं सांगतायत. नरेंद्र मोदी भरकटत चाललेत. आणि सामान्य लोकांच्या हिताचे मुद्दे त्यांच्या भाषणातून बाजूला पडतायेत, असं रोहित पवार म्हणाले.
नरेंद्र मोदी आम्हाला नकली म्हणतात. पण नकली कोण आणि असली कोण हे चार तारखेनंतर आपल्याला कळेल. असली लोक हे मतदार आहेत आणि ते असले लोकांच्याच पाठीमागे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीलाच भरघोस यश मिळेल, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदींच्या पिंपळगावच्या सभेत धुळे आणि अहमदनगरहून लोकं आणली गेली होती. मतदार कमी आणि कार्यकर्ते काही प्रमाणात अशी परिस्थिती मोदींच्या सभेला होती. मोदींच्या आजच्या सभेत कुठेही उत्साह नव्हता. मोदींनी देखील भाषण आवरते घेत तिथून काढता पाय घेतला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोदींच्या सभेत बंदी केली असेल. तर मोदींचा आणि भाजपचा विश्वास मतदारांवर देखील राहिलेला नाहीये. त्यांना फक्त शो बाजी करायची होती. आम्ही सभा घेऊ शकतो हे दाखवायचं होतं, असंही रोहित पवार म्हणालेत.