आदिवासीबहुल गावातील युवक २ वेळेस एमपीएससी उत्तीर्ण; तरुणांनी वाचावी अशी प्रेरणादायी कहाणी

| Updated on: Apr 20, 2023 | 1:19 PM

माध्यमिक शिक्षणासाठी नीलेश कोपरगाव येथील जंगली महाराज आश्रमात शिकायला गेले. तेथील शिक्षकांचा नीलेश यांच्यावर मोठा प्रभाव पडला.

आदिवासीबहुल गावातील युवक २ वेळेस एमपीएससी उत्तीर्ण; तरुणांनी वाचावी अशी प्रेरणादायी कहाणी
Follow us on

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दुडगाव हे आदिवासीबहुल गाव. महीराणीजवळील या गावातील लोकसंख्या जेमतेम एक हजार. दुडगावात शरद चव्हाण हे शेतकरी राहतात. नीलेश हा त्यांचा मुलगा. शेतात राबून त्यांनी मुलाला शिक्षण दिलं. मुलगा मोठा व्हावा, यासाठी कष्ट उपसले. नीलेश यांचे प्राथमिक शिक्षण दुडगाव येथे झाले. माध्यमिक शिक्षणासाठी नीलेश कोपरगाव येथील जंगली महाराज आश्रमात शिकायला गेले. तेथील शिक्षकांचा नीलेश यांच्यावर मोठा प्रभाव पडला. घरी शेती असल्यामुळे नीलेश यांनी बारामती येथून बीएस्सी अॅग्री बायोटेकची पदवी घेतली.

दोन वेळा पटकावली दोन पदं

नीलेश यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. नीलेश यांनी २०२१ मध्ये झालेल्या एमपीएस परीक्षेत महाराष्ट्रातून ओबीसी प्रवर्गात पाचवा क्रमांक पटकावला. एमपीएससी परीक्षेत राज्यातून त्यांचा २५ वा क्रमांक आहे. त्यापूर्वी म्हणजे २०२० मध्ये नीलेश यांनी एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेतही नीलेश यांनी राज्य कर निरीक्षक हे पद मिळवलं होतं.

हे सुद्धा वाचा

नीलेश यांची गावात मिरवणूक

एकदा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली तरी नीलेश यांनी अभ्यास सुरूच ठेवला. त्यामुळे दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी चांगले यश मिळवले. याचा गावात अतिशय आनंद झाला. दुडगाव येथील गावकऱ्यांनी नीलेशची मिरवणूक काढली. गावात जाहीर सत्कार केला.

२७ व्या वर्षी प्राप्त केले यश

वयाच्या २७ व्या वर्षी नीलेश यांनी हे यश प्राप्त केले आहे. यानिमित्त गावात त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात माजी महापौर दशरथ पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी भदाणे, विलास शिंदे, मुरलीधर पाटील, दिनकर आढाव, नयना घोलप, संपत सकाळे, करण गायकर, विष्णुपंत म्हैसधुणे, गोपाळराव पाटील, बाजीराव भागवत तसेच गावकरी उपस्थित होते.

गावकऱ्यांनी केले नीलेश यांचे कौतुक

नीलेश चव्हाण या तरुणाची विशेषता अशी की त्यांनी दोनवेळी एमपीएससी परीक्षा सलग उत्तीर्ण केली. पहिल्या प्रयत्नात त्यांनी राज्य कर निरीक्षक या पदाला गवसणी घातली. तर दुसऱ्या प्रयत्नात नीलेश यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी हे पद काबिज केले. त्यामुळे गावात उत्साहाचं वातावरण आहे. आपल्या आदिवासी गावातून त्याने हे यश मिळवले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी नीलेश यांचे कौतुक केले आहे.