नाशिक: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप नेते प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा आणि सुधांशु त्रिवेदी यांच्याकडून झालेल्या महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ शनिवारी 17 डिसेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीने या मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाला अद्याप परवानगी मिळाली नाही. त्यामुळे मोर्चा निघणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोर्चा निघणार असल्याचा दावा केला आहे. 17 तारखेचा मोर्चा सरकार थांबवू शकणार नाही, असा इशाराच संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना दिला आहे.
मोर्चाला परवानगी मिळेल. देशात लोकशाही आहे. देशात अधिकृत हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. लोकशाहीत लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाला कुणी आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत आहे. तो एक प्रकारचा मोर्चाच आहे. त्यामुळे आमचाही मोर्चा निघेल, असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात अनेक विषय गंभीर आहे. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या आमच्या दैवतांचा अपमान घटनात्मक पदावर बसलेला व्यक्ती खुलेआम करत आहे. त्याचं समर्थन सरकार करत आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. आम्ही मोर्चा काढू नये असं सरकारला वाटत होतं तर मग राज्यपालांना हटवायला हवं होतं. राष्ट्रीय प्रवक्त्यांवर कारवाई करायला हवी होती. का केली नाही? असा सवाल त्यांनी केला.
आम्ही मोर्चा काढणारच आहोत. 17 तारखेच्या आमच्या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही, असं सांगतानाच सीमाभागात तणाव आहे. त्यामुळे आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही. आम्ही अनेक प्रश्नांवर मोर्चा काढून महाराष्ट्राचा आवाज केंद्रापर्यंत पोहोचवू. हा फक्त शिवसेनेचा मोर्चा नाही. हा जनतेचा मोर्चा आहे. आम्ही फक्त नेतृत्व करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शनिवारी निघणाऱ्या मोर्चाला कार्यकर्ते नक्कीच येतील. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा हा विषय आहे. अस्मितेचा विषय आहे. महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे. सरकार तोंडाला कुलूप लावून बसलं आहे. पण जनता तोंडाला कुलूप लावून बसलेली नाही. जनता बोलेल. जनता 17 तारखेला घोषणा देईल, गर्जना करेल. या गर्जना दिल्लीच्या तख्तापर्यंत जाईल, असा दावाही त्यांनी केला.
मोर्चा किती मैल चालला यापेक्षा मोर्चाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येणार आहेत. निषेध व्यक्त करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुलेंबद्दल श्रद्धा व्यक्त करणार आहेत, हेच महत्त्वाचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.