नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi at Nashik) आज नाशिकचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी नाशिक नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नुकतेच नाशिकमध्ये आगमन झाले आहे. आज नाशिक येथे काळाराम मंदिराचे दर्शन घेणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा नाशिक दौरा अनेक कारणांमुळे विशेष मानला जात आहे. वनवास काळात प्रभू रामाने येथे वास केला होता. हा भाग पंचवटी म्हणून ओळखला जातो. या परिसरात काळा राम आणि गोरा राम अशी दोन मंदिरे आहेत. त्यापैकी काळाराम मंदिर हे अतिप्राचीन आहे. या ऐतिहासीक मंदिराला पंतप्रधान मोदी आज भेट देणार आहेत.
पंतप्रधान मोदी आधी काळाराम मंदिरात दर्शन घेणार त्यानंतर ते गोदावरीची महाआरती करतील. नाशिकमध्ये मोदींचा भव्य रोड शो होणार आहे. मिर्ची चौक ते स्वामी जनार्दन महाराज चौकापर्यंत हा रोड शो होणार आहे. महाराष्ट्रासह सर्वच राज्यातील युवांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. अनेक ढोल पथकांचा देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे शिवताल या ढोल पथकात दहा वर्षाच्या चिमुरडीचा सहभाग असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी 12 जानेवारी रोजी शहरातील तब्बल 18 रस्ते वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
सकाळी 6 ते उद्घाटन कार्यक्रम संपेपर्यंत रस्ते बंद राहणार आहेत. वाहनचालकांनी द्वारका उड्डाणपूल, अमृतधाम-रासबिहारी मार्ग, पंचवटी कारंजा-मालेगाव स्टँड, रविवार कारंजा ते रामवाडी मार्ग, अमृतधाम जंक्शनपासून डावीकडे घेऊन बळी मंदिराजवळील उड्डाणपूल वापरून मारुती वेफर्स हाऊसच्या दिशेने जाण्याचा सल्ला दिला गेला आहे.