मनोहर शेवाळे, प्रतिनिधी, मालेगाव : तुम्ही दूध पित असाल तर पाहून प्या. कारण गाय, म्हशींचे दूध वाढावे, यासाठी ऑक्सिटोसीनचा वापर केला जातो. यामुळे दुधात विषयुक्त पदार्थ जातात. हे मानवी शरीरासाठी धोकादायक आहे. दूध पिताना ते कुठून येते. याची शास्वती करून नंतर प्या. कारण आजकाल दुधातही भेसळ व्हायला लागली आहे. शहरातील हिरापुरा भागात पोलिसांनी छापा टाकत मोहम्मद इकबाल या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 हजार ऑक्सिटोसीन बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. मालेगाव परिसरात सर्रास या जीवघेण्या औषधाचा वापर केला जातो. पोलिसांच्या दुसऱ्या कारवाईवरून ही बाब समोर आली आहे.
काही गोठ्यांवर नजर ठेवत औषधाच्या बाटल्याचा वापर जनावरांचे दूध वाढविण्यासाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
या औषधाचा वापर अन्य वैद्यकीय कामासाठीदेखील होत असतो. मात्र जनावरांचे दूध वाढावे, यासाठी या औषधांचा सर्रास वापर होतो. त्याचा अवैधरित्या साठा करून ते मालेगावमध्ये वितरित होत असल्याचं समोर आल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे.
शहरातील हिरापुरा भागातील मोकळ्या मैदानाच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या खोलीवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात मोहम्मद अन्वर मोहम्मद इकबाल हा विनारंगाच्या ऑक्सिटोसीन औषधाच्या बाटल्या विक्री करताना आढळून आला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून 60 हजार च्या बाटल्या जप्त केल्या. प्रत्येकी 100 ml च्या पाच खोक्यांमध्ये ठेवलेल्या 1000 प्लास्टिकच्या बाटल्या होत्या. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक प्रशांत विठ्ठल ब्राह्मणकर यांनी संशयितांविरुद्ध किल्ला पोलिसांत तक्रार दिली. या सर्व प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे विषयुक्त दूध आपण पित असू तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. त्यामुळे दूध पिताना सावधान राहणे गरजेचे आहे.