नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावलीयं. मुंबई, कोकण, पुणे, ठाणे, नगर, आैरंगाबाद आणि नांदेड असा सर्वदूर पाऊस सध्या राज्यात सुरू आहे. मात्र, यंदा नाशिककडे पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये (Nashik) समाधानकारक पाऊस झाला नाहीयं. राज्यात इतर ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसतांना दिसतायंत. 4 जूनला साधारणपणे राज्यात पाऊस दाखल होणार होता. मात्र, जुलै महिना उलटल्यावर राज्यात पाऊस सक्रिय झाला. यामुळे अनेक धरणातील (Dam) पाणीसाठा तळाला गेल्याचे चित्र आहे.
जून महिना उलटून गेल्यानंतरही नाशकात समाधानकारक पाऊस न पडल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व मुकणे धरणांनी आता तळ गाठले आहेत. यामुळे नाशिकमध्ये सध्या पाणीटंचाईचे संकट आहे. शहरात पाणीकपात लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे जोरदार पावसाच्या अपेक्षेमध्ये नाशिककर आहेत.
नाशिकच्या गंगापूर व मुकणे धरण्यात सध्या अवघा 25 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आता नाशिककरणभोवती पाणी कपातीचे संकट गोंगावत आहे. महापालिका आयुक्त यासंदर्भात सोमवारी आढावा बैठक घेणार असून बैठकीत पाणी कपातीचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. पाणीकपात टाळण्यासाठी नाशिकमध्ये जोरदार पाऊस होणे गरजेचे आहे.