नाशिक : नाशिक (Nashik) शहरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, आता पुन्हा एकदा शहर आणि जिल्हात संततधार पाऊस सुरूयं. पावसामुळे शहरातील रस्त्याचे तीन तेरा वाजले असून रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने अपघातांच्या (Accident) घटनांमध्ये वाढ झालीयं. शहरातील कोणत्याही रस्त्यावर जा तुम्हाला खड्डेच खड्डे बघायला मिळतील. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे काम करून खड्डे बुजवल्याचा दावा केला होता. मात्र, पहिल्याच पावसामध्ये महापालिकेचे (Municipality) पितळ उघडे पडले होते.
नाशिक शहरातील रस्ते जर आपण बघितले तर रस्त्यांवर मोठे खड्डे बघायला मिळतील. या रस्त्यांनी वाहने चालवणे म्हणजे मोठी तारेवरची कसरतच आहे. त्यामध्ये पाऊस सुरू असल्याने वाहनचालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणाम गाडी थेट खड्ड्यामध्ये जाते आणि जोरात धडकते. रस्त्यावरील खड्यांमुळे वाहनाचे देखील मोठे नुकसान होताना दिसते आहे. बऱ्याच वेळा गाड्या या खड्ड्यांमध्ये अडकून पडतात.
नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार पुन्हा सुरू झालीयं. शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे संपूर्ण शहर खड्डेमय झाले. आता या पावसामुळे नाशिककरांना खड्ड्यांमधून चिखल तुडवत आपला प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे नाशिककरांची चिंता पावसाच्या कमबॅकमुळे अधिक वाढली आहे. शहरामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू असल्याने अनेक रस्ते देखील बंद करण्यात आलीयंत.