पैठणी (Paithani) साडीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने विणकर संकटात सापडले आहेत. पैठणीसाठी लागणारा कच्चामाल (Raw material) हा बंगळुरुहून (Bangalore) येवल्यात येतो. सध्या पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. वाहतूक खर्च वाढल्याने मालाच्या दरात देखील वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. पैठणी साडीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत पैठणी साडीचे दर वाढले नसल्याने व्यवसायिक संकटात सापडले आहेत. जगायचं कसं असा प्रश्न त्यांना पडला आहे. कच्च्या मालाचे भाव अव्वाच्या सव्वा वाढले असून, व्यवसाय परवडत नाही. व्यवसायातून मिळणाऱ्या मार्जीनमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे सरकारने कच्च्या मालाचे भाव कमी करावेत, आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी व्यवसायिकांनी सरकारकडे केली आहे.
दरम्यान एकीकडे पैठणीसाठी लागणारा कच्चा माल तर महाग झालाच आहे. मात्र दुसरीकडे तुतीचे पीक देखील पावसामुळे नष्ट झाले आहे. त्यामुळे रेशीम उद्योग देखील संकटात सापडला आहे. यंदा तुतीला अवकाळी पावसाचा फटका बसला. अवकाळी पावसामुळे तुतीच्या पिकात घट झाली. परिणामी रेशीमचे देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ शकले नाही. पैठणीसाठी लागणार कच्चा माल महाग झाला आहे. सोबतच रेशीमचे उत्पादन कमी असल्यामुळे त्याच्या देखील भावात वाढ झाल्याने विणकर दुहेरी संकटात सापडले आहेत. काही महिन्यापूर्वी पाच हजार रुपये भाव असलेल्या रेशीमचा दर आता साते ते साडेसात हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता कच्च्या मालाचे दर कमी करून आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी व्यवसायिकांकडून करण्यात येत आहे.
येवला शहर हे पैठणीसाठी प्रसिद्ध आहे, येवल्यात तयार होणाऱ्या पैठणीला देशभरात मोठी मागणी असते. पैठणीच्या माध्यमातून मोठी उलाढाल होते. अनेकांना रोजगार मिळतो. मात्र सध्या पैठणीसाठी लागणारा कच्चा माल महागल्याने मार्जीनमध्ये घट झाली आहे. कच्चा माला महाग झाला मात्र दुसरीकडे पैठणीच्या दरात वाढ न झाल्याने उद्योजक संकटात सापडले आहेत.