नाशिक : नागरिकांचा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा विरोध डावलून, नाशिकमध्ये स्मार्ट सिटीचे काम रेटून नेले जात असल्याचं बघायला मिळत आहे. गेल्या 30 वर्षांपासून एकही खड्डा नसलेल्या मेन रोडचा चांगला काँक्रीट रस्ता खोदण्याचं काम स्मार्ट सिटीकडून केलं जात आहे. नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी या कामाला कडाडून विरोध केला आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात अनेक कामं सुरू आहेत. मात्र हे काम या ना त्या निमित्ताने वादात सापडले आहेत. शहरातील मध्यवस्तीत आणि अत्यंत गजबजलेल्या मेन रोड परिसरातील रस्ता खोदण्याचे काम सिटी प्रशासनाने सुरू केले. या कामाला स्थानिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. 30 वर्षांपासून कोणताही खड्डा न पडलेला चांगला काँक्रीट रस्ता उखडून स्मार्ट सिटी प्रशासन नेमकं काय करू पाहते आहे? असा सवाल काँग्रेसचे शाहू खैरे यांनी उपस्थित केला आहे.
दुसरीकडे स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील हा रस्ता तोडू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने आता व्यापारी लोकप्रतिनिधी सामान्य नागरिक विरुद्ध स्मार्ट सिटी असा संघर्ष निर्माण झाला आहे. सुरुवातीपासूनच वादात सापडलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये आता मेन रोडच्या कामाची आणखी वादाची भर पडली आहे. विशेष म्हणजे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हा रस्ता खोदला जाणार आहे. यामुळे येणाऱ्या दिवसात नाशिककरांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल असंच चित्र आहे.
Road damage for Smart City project in Nashik citizens and congress oppose