मालेगावः यत्र तत्र सर्वत्र घोळ आणि घोळ. कोरोनाच्या (Corona) दोन्ही लाटेदरम्यान राज्यभरात अनेक ठिकाणी केलेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मुंबईतील कोरोना घोटाळ्यावरून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी उभा महाराष्ट्र पाहतोय. त्यातच नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये कोरोनाच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. या ठिकाणी आरटीपीसीआर लॅब (RTPCR Lab) उभारण्याच्या कामासाठी तब्बल 75 टक्के रक्कम आगावू उचल म्हणून नाशिक येथील एका कंपनीला देण्यात आलीय. आता या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतायत. मालेगाव महापालिकेचे निवडणूक येणाऱ्या काही दिवसांत होणाराय. तत्पू्र्वीच हे प्रकरण समोर आले आहे. हा करार रद्द करावा, अशी मागणी होताना दिसतेय. सध्या महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. विशेष म्हणजे महापौर ताहेरा शेख यांच्यासह 27 काँग्रेस नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. आता येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका आहेत. त्यावरून सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झालेत. या आरोपामुळे सत्ताधाऱ्यांची अडचण वाढलेली दिसतेय.
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये दररोज वाढणारी रुग्णसंख्या प्रचंड होती. या रुग्णांचे आरटीपीसीआर रिपोर्ट येण्याला तीन दिवसांचा कालावधी लागत होता. म्हणून शासनाने मालेगाव शहरात आरटीपीसीआर लॅब कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी नाशिक येथील एका कंपनीला कंत्राट देण्यात आले. मात्र कोरोनाची पहिली, दुसरी, तिसरी लाट ओसरली आहे. राज्य शासनाने आता सर्व निर्बंध उठविले आहेत. तेव्हा कुठे संबंधित कंपनीने कामाला सुरुवात केली आहे. गरज सरल्यावर उभ्या राहणाऱ्या या लॅबसाठी नियमबाह्यपणे 75 टक्के आगाऊ रक्कम देण्यात आले आहेत. या कामावर नगरसेवक मुस्तकिन डिग्नीटी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मालेगाव शहरात एकही कोरोना रुग्ण आढळून येत नाही. शहर शंभर टक्क कोरोनामुक्त झाले आहे. असे असताना नाशिक येथील देवाशिष एंटरप्राइजेस कंपनीने तब्बल आठ महिने उशिराने लॅबच्या कामाला सुरुवात केली आहे. तीन कोटी रुपयात हे कंत्राट संबंधित कंपनीला देण्यात आले असून, महापालिकेने आतापर्यंत पन्नास टक्के रक्कम म्हणजे जवळपास दीड कोटी रक्कम संबंधित कंपनीला अदा केली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी सपना ठाकरे यांनी दिली आहे. कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्याशिवाय कंत्राटाची रक्कम देणे घटनाबाह्य असताना देखील संबंधित कंपनीला पन्नास टक्के रक्कम कशी काय दिली, असा सवाल आता निर्माण होत आहे.
मालेगावमध्ये सध्या आरटीपीसीआर लॅबचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी कॅम्पातील शाळेच्या वर्गखोलीत केवळ फरशी बसविण्याचे काम तात्पुरता स्वरुपात सुरू झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला असताना आता लॅब उभारणीसाठी सुरू असलेल्या अट्टाहासामुळे राजकीय वातावरण तापले आहे. नगरसेवक मुश्तकिन डिग्नीटी यांनी यात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला असून, हे कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान होणार नाही, असा दावा त्यांनी केलाय.