नाशिक: मराठा आरक्षणासाठी पुणे ते विधानभवन लाँगमार्च काढावा अशी आमची इच्छा नाही. सरकारने एक महिन्यात आमच्या मागण्या मार्गी लावाव्या. आमची आंदोलने थांबली नाहीत. बैठकाही सुरूच राहणार आहेत. मात्र, सरकार 21 दिवसात प्रश्न मार्गी लावत असल्याने एक महिना मराठा मूक आंदोलन पुढे ढकलत आहोत, असं जाहीर करतानाच या महिन्याभरात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशारा खासदार संभाजी छत्रपती यांनी दिला आहे. (sambhaji chhatrapati postponed maratha muk morcha for a month)
खासदार संभाजी छत्रपती यांनी आज सकाळी नाशिकमध्ये मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी व्हायला 21 दिवस लागतील. प्रशासकीय स्तरावर त्याची अंमलबजावणी होत आहे, असं सांगतानाच समन्वयकांनी आंदोलन न थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने एक महिन्यात मागण्या पूर्ण कराव्यात नाही तर पुढची दिशा ठरवावी लागेल, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. तसेच मराठा मूक मोर्चा एक महिन्यासाठी स्थगित करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आम्ही मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर, नाशिक, रायगड, औरंगाबाद आणि अमरावती या ठिकाणी मूक आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कोल्हापूर आणि नाशिकमध्ये आंदोलन झालं आहे. 36 जिल्ह्यात जायची आमची इच्छा नाही. आम्हाला समाजाला दिशाहीन करायचं नाही. त्यांना दिशा द्यायची आहे. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, समाजाला वेठीस धरू नये, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचा तपशीलही दिला. तसचे सरकारने मागण्या मान्य केल्या असून सरकार सकारात्मक असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्य सरकारने येत्या गुरुवारी पुनर्विचार याचिका दाखल करणार असं सांगितलं आहे. आयोग स्थापन करण्यात अडचणी असतील तर गायकवाड कमिशनच्या त्रुटी दूर करण्यासाठी होमवर्क करण्यासाठी पावलं उचला असं सरकारला सांगितलं आहे. त्यावर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी नरेंद्र पाटील यांच्या आंदोलनावरही भाष्य केलं. नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी कुठल्या पार्टीचा अजेंडा घेण्यापेक्षा समाजाचा अजेंडा घ्यावा, असा टोला संभाजीराजे यांनी लगावला.
ज्या प्रमाणे मी मराठ्यांसाठी लढा देतो तसा सर्व समाजासाठी माझा लढा असणार आहे. ओबीसी समाजाला काही अडचण असेल तर मी त्यांच्यासोबत आहे, असं त्यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंतप्रधानांनी समाजाच्या भावना लक्षात घेऊन मध्यस्थी करावी. पंतप्रधानांकडून एका दिवसात अपॉइंटमेंट मिळेल. सर्व खासदारांनी एकत्र येऊन पंतप्रधानांकडे वेळ मागितला पाहिजे. ते नक्की भेटतील. मी जेव्हा जेव्हा वेळ मागितली, तेव्हा तेव्हा त्यांनी मला वेळ दिली आहे, असं त्यांनी सांगितलं.
संभाजीराजे यांनी मराठा आंदोलन हाती घेतल्यापासून त्यांच्या शर्टाचा रंगही बदलत चालला आहे. त्यावर त्यांना मिश्किल सवाल केला असता त्यांनीही तितक्याच मार्मिकपणे उत्तर दिलं. नाशिकमध्ये मी काळा शर्ट घातला होता. मुंबईत डार्क ब्लॅक कुर्त्यावर गेलो होतो. आज जरा फिक्का रंग झाला. याचा अर्थ असा की मार्ग निघत आहे. मार्ग लवकर निघाला तर पांढरा शर्ट घालूनही मी येईल, असं मार्मिक उत्तर त्यांनी दिलं. (sambhaji chhatrapati postponed maratha muk morcha for a month)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 21 June 2021 https://t.co/Z9QmN28e5z #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2021
संबंधित बातम्या:
मराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत
(sambhaji chhatrapati postponed maratha muk morcha for a month)