हरियाणा आणि जम्मू-काश्मीर येथील विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वी एक्झिट पोलने सत्तेच्या समीकरणाची गणितं मांडली आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी या निकालापूर्वीच मोदी तो गयो, असा चिमटा काढला आहे. या निवडणुकीच्या निकालापूर्वीच राऊत यांनी जोरदार शाब्दिक फटाके फोडले. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर तोंडसूख घेतले होते. त्यांनी महाविकास आघाडीमुळे अनेक प्रकल्प खोळंबल्याचा आरोप केला होता. तर काँग्रेसचे पदाधिकारी ड्रग्ज रॅकेटमध्ये आढळल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राऊतांनी असा जोरदार प्रहार केला.
मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका
नाशिकमधील मेळाव्यात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे येथील सभेत उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. त्यांच्यामुळे प्रकल्प रखडले. मेट्रो, बुलेट ट्रेन रखडल्याचा आरोप केला. पंतप्रधानांनी या सर्व प्रकल्पाचा खर्च वाढल्याचा आरोप केला होता. त्यावर राऊतांनी पलटवार केला. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळी शिंदे हे चार वर्षांचे असतील आणि ते गोधडीत… अशा खालच्या भाषेत त्यांनी टीका केली.
भाजपचा पराभव होणार
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने योजनांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच योजनेचे अनेकदा उद्धघाटन करत असल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे. नेमका हाच धागा पकडून संजय राऊत यांनी पण पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. ‘मोदी तो गयो’, असा टोला पण त्यांनी लगावला. मोदी सरकारने आता कुठेही निवडणुका घ्याव्यात, भाजपचा पराभव होणार, असा दावा त्यांनी यावेळी केला. आता परिवर्तनाची ताकद आपल्याकडे आहे. मोदींच्या राज्यात अन्यायाचा कहर झाला. परिवर्तनाची ताकद आपल्याकडे असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, महाविकास आघाडी, इंडिया आघाडीतील कोणताही घटक पक्ष निवडून येईल. तेच लोकं निवडणूक जिंकतील, मोदी तो गयो असा चिमटा त्यांनी काढला.