नाशिक : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचा काही लोकांनी धसका घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अपप्रचार करण्यात येत आहे. तुम्ही कितीही अपप्रचार करा. सर्व जाती धर्माचे लोक या सभेला येणार आहेत. हा लोकांचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्याने काही होणार नाही. माझ्या भाषेत सांगायचं तर मालेगावच्या सभेने या लोकांची हातभर फाटलीय, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे हे नियोजित मार्गानेच सभेला येणार आहेत. ते आपला मार्ग बदलणार नाही, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मालेगावातील सभेची माहिती दिली. या सभेची तयारी कशी झालीय हे सुद्धा स्पष्ट केलं. मालेगावच्या सभेकडे राज्याचे नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे. दिल्लीतून मला काही फोन आले. मालेगावच्या सभेविषयी विचारणा केली. सभेविषयी देशभरातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सभा मालेगावात होत आहे. उद्धव ठाकरे या देशातील घडामोडीवर, महाराष्ट्रातील घडामोडीवर काय भाष्य करतात. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रेकॉर्डब्रेक शब्दही कमी पडतील एवढी विराट ही सभा होणार आहे. त्यानुसार तयारी झाली आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते इथे आले आहेत. गावागावात जाऊन लोकांना अमंत्रण दिलं आहे. या सभेला भाड्याने कोणी येणार नाही. 300 आणि 500 रुपये रोजाने माणसे आणली जातात आणि मुख्य भाषण सुरू होताच लोक निघून जातात. ही सभा तशी नसेल. ही सभा राज्याला आणि देशाला दिशा देणारी असणार आहे. अनेक संस्थानी या सभेला यावं म्हणून सुट्ट्या दिल्या आहेत. सभेला येता यावं म्हणून कामं थांबवली आहेत. इतकी लोकांमध्ये उत्सुकता आहे, असं राऊत म्हणाले.
सभेसाठी उर्दूतून पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर शिंदे गटाकडून टीका करण्यात आली. त्यालाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. उर्दूवर देशात बंदी आहे का? एखाद्या भाषेवर बंदी आहे का? उर्दू या देशातील भाषा नाही का? कालच ऐकलं कुणी तरी जावेद अख्तर यांचं कौतुक केलं. पाकिस्तानात जाऊन या देशाची भूमिका मांडणारी जी भाषा आहे ती उर्दू आहे. ज्या जावेद अख्तरांचं कौतुक केलं, ज्या गुलजारांचं आपण कौतुक करतो ते आजही उर्दूत लिहितात, असा टोलाही त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांचा ताफा मौसम पुलावरून येणार आहे. पोलिसांचं म्हणणं वेगळ्या मार्गाने या. पण ते मुख्य रस्त्याने येणार आहेत. लोकांना उत्सुकता आहे. अनेकांना उद्धव ठाकरे यांचं दर्शन घ्यायचं आहे. लाखो लोक जमणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी भीती वाटत आहे. काहीही घडू शकते. पण आम्ही सर्वांना शांततेचं आवाहन केलं आहे, असंही ते म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. या देशात पक्षांतर करणारे महाराष्ट्रातील 16 आमदार अपात्र ठरवले जात नाही. निवडणूक आयोग बेईमानाच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देते. पण राहुल गांधी यांची खासदारकी 24 तासात रद्द केली जाते. या देशात दोन वेगवेगळे कायदे तयार झाले आहेत. विरोधकांसाठी वेगळे कायदे. भाजपसाठी वेगेळे कायदे. बेईमानांसाठी वेगळे कायदे तयार झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.