नाशिक: कर्नाटक सरकारने आधी सोलापुरातील गावांना कर्नाटकात येण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर आता या भागातील दुष्काळग्रस्तांसाठी पाणी सोडण्यासाठी खेळी कर्नाटक सरकारने केली आहे. महाराष्ट्रातील गावांना अमिषं दाखवून त्यांना आपल्याकडे ओढण्याचा कर्नाटकाचा हा डाव असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उठलेली असतानाच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कर्नाटकाने सोडलेल्या पाण्यातच मुख्यमंत्र्यांनी जलसमाधी घ्यावी. चुल्लूभर पाण्यात डुबावं, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने कर्नाटकाने सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्यावी. या महाराष्ट्रावर अशा पद्धतीने गेल्या 50 ते 55 वर्षात आक्रमण झालं नाही. बाजूच्या राज्याचा मुख्यमंत्री डिवचतोय, आव्हान देतोय तुम्हाला.. ते जे पाणी सोडलंय ना.. चिल्लूभर पाणी में डूब जाव म्हणतो ना आपण.. जा त्या पाण्यात जलसमाधी घ्या. तुम्हाला स्वाभिमान असेल तर, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
ज्या स्वाभिमानामुळे तुम्ही शिवसेना सोडली म्हणताय, मग आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? कर्नाटकाचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर थुंकतोय. तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली असं तुम्हीच सांगताय ना. आता क्रांती करा ना. छत्रपतींचा अपमान सुरू आहे. कुठाय तुमची क्रांती? क्रांतीची वांती झाली काय? असा सवाल राऊत यांनी केला.
नरेंद्र मोदीबद्दल आदर आहे. ते आपले पंतप्रधान आहेत. गुजरातच्या एका प्रचार सभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी भाषणाच्या ओघात मोदी हे रावण आहेत का? असा सवाल त्यांनी केला. त्यावर मोदींनी अश्रू ढाळले.
मोदी म्हणाले, पाहा हा माझा अपमान नसून गुजरातचा अपमान आहे. गुजरातच्या सुपुत्राचा अपमान आहे. आता या एका मुद्द्यावर निवडणूक लढवली जात आहे. पण महाराष्ट्रात महाराजांचा अपमान होऊनही शिंदे गट गप्प आहे. छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? असा सवाल त्यांनी केला.