नाशिकः भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शंभर कोटींचा टॉयलेट घोटाळा (toilet scam) केलाय. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात जावं लागेल, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या घोटाळ्याची कागदपत्रे दाखवली. ते नाशिक येथे आले असता बोलत होते. राऊत म्हणाले की, किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) या देशातल्या सर्वात मोठा टॉयलेट घोटाळा केला आहे. आयएनएस विक्रांत घोटाळा सुद्धा पैशाचा अपहार आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम राबवली. आम्ही सर्व त्यात होतो. आयएनएस विक्रांत वाचावी. त्यात संरक्षणविषयक म्युझियम बनवावं, अशी मोहीम होती. सरकारने त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आमची मागणी होती. दुर्दैवाने ती पूर्ण झाली. त्यानंतर या महाशयांनी स्वतःची सेव्ह विक्रांत मोहीम सुरू केली आणि त्यात घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी यावेळी केला.
संजय राऊत म्हणाले की, सोमय्या यांनी विक्रांत वाचवायच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा केले. लोकांनी पैसे दिले. लोकांना वाटलं पैसे योग्य ठिकाणी पोहचले, पण गेल्या दोन महिन्यांपूर्वी अशी माहिती समोर आली की, हे पैसे जिकडे जायचे आहेत, तिकडे गेले नाहीत. मध्येच कुठेतरी या पैशाचा अपहार झालेला आहे. त्यानंतर काही त्यानंतर काही निवृत्त लष्करी जवानांनी तक्रार दाखल केली. दिलासा कोर्ट म्हणतं 2013 च्या प्रकरणी आता गुन्हे दाखल होतायत. पण हे पूर्णतः चुकीचंय. कारण आतापर्यंत पैशाचा अपहार झाल्याचे आता उघड झाले आहे. 2022 मध्ये राजभवनातून ही माहिती मागवली. त्यावेळी हे समोर आलं. 58 कोटींचा हिशेब आम्ही मागतोय. मात्र, हा आकडा कुठून आणला असे आरोपी म्हणतोय. आमचं असं म्हणणंय की 58 कोटी 158 कोटी हे पोलीस तपासात निष्पण्ण होईल.
संजय राऊत म्हणाले की, सत्र न्यायालयानं विक्रांत घोटाळ्याबाबत जामीन नाकारताना बेइमानी झालेली आहे, हे विचारात घेतलं. अविश्वासाचं वातावरण निर्माण झाल्याचं सत्र न्यायालयाचं निरीक्षण आहे. म्हणून त्यांना जामीन नाकारलाय. मात्र, सध्या हायकोर्टामध्ये जो दिलासा घोटाळा सुरूय त्या घोटाळ्यात हे एकाच पक्षाचे लाभार्थी असतात. त्या लाभार्थींना हा लाभ मिळालाय. देश कुठे चाललाय हे यातून कळतंय. यातून सरळसरळ अपहार दिसतोय. ही सरळसरळ लोकांची फसवणूक आहे. सरळसरळ देशाच्या भावनेशी खेळून कोट्यवधी रुपये गोळा केलेत. आणि तरीही त्यांना दिलासा मिळतो. मात्र, आमचे असंख्य कार्यकर्ते, लोकांना एक रुपयाचाही दिलासा कधी मिळालेला नाहीय. फक्त केंद्रीय तपास यंत्रणाही नाही, तर न्याय यंत्रणाही कोण चालवतेय, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे, हे दुर्दैवाने आम्हाला इथे बोलावे लागतेय.
राऊत म्हणाले की, मी कालच विक्रांत घोटाळ्यातल्या आरोपीचा शंभर कोटींचा टॉयलेट घोटाळा काढलाय. (यावेळी राऊतांनी घोटाळ्याची कागदपत्रे माध्यमांना दाखवली.) माणसे कुठे पैसे खाऊ शकतात, तर टॉयलेटमध्ये सुद्धा. हा मीरा-भाईंदर पालिकेच्या आयुक्तांचा अहवालय. किरीट सोमय्या, त्यांची पत्नी आणि मुलाचे एक एनजीओ आहे. त्याचे नाव युवा प्रतिष्ठान. त्यांनी खोटी बिले तयार करून युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कांदळवनाची बेकायदेशीरपणे कत्तल करून तिथे निधी वापरला. महापालिकांचे कोट्यवधी रुपये हडप केले. यासंदर्भातले कागद इथे आहेत. या कागदावरतीच गुन्हा दाखल होणारय. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा अटकपू्र्व जामिनासाठी जावं लागेल. आपल्याला आज ना उद्या अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या बाजूच्या कोठडीत रहावं लागेल.