नाशिकः राष्ट्रगीत म्हणता न येणारेही आता हनुमान चालीसा म्हणायला निघालेत, असे म्हणत संजय राऊतांनी (Sanjay Raut) शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि खासदार नवनीत राणा यांना जोरदार टोला लगावला. राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात जे उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी सरकारविरोधात किंवा आमच्या विरोधात बोलतात त्यांना झेड सुरक्षा देतील. डबल झेड सुरक्षा देतील. मात्र, इथे कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याच्या जीविताला धोका नाही. तसा असेल, तर महाराष्ट्रातील पोलीस दल अतिशय सक्षम आहे. याची माहिती केंद्राला आहे, पण तरीही केंद्र सरकार महाविकास आघाडीवर बेछूट आरोप करत आहे. असे करून केंद्राचा पैसा उडवत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे, हे सांगायलाही राऊत विसरले नाहीत. संजय राऊत कालपासून नाशिकच्या (Nashik) दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी सकाळी काळाराम मंदिरात जात आरती केली. त्यानंतर दुपारी पत्रकार परिषद घेत भाजप, मनसेवर आरोपाच्या जोरदार फैरी झाडल्या.
खासदार संजय राऊत म्हणाले की, नाशिक शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्यासाठी अयोध्येचा कार्यक्रम आखला होता. आम्ही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जाणार अयोध्येला जाणार आहोत. शरयू नदीवर हा कार्यक्रम होईल. हा संपूर्ण देशाचा कार्यक्रम आहे. आम्ही फार पूर्वीपासून अयोध्येला जातो. बाबरी पाडण्यापूर्वीपासून. ते आता राम मंदिराचा कळस उभा करण्यापर्यंत. आम्ही निर्मळ मनाने तिथे जातो. तुम्ही त्या ठिकाणी निर्मळ भावनाने या, असे आवाहन त्यांनी केले. शिवाय महाराष्ट्रासह इतर दंगली घडवून राष्ट्रपती राजवट राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
संजय राऊत यांच्या आरोपाचा आज मुंबईत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी समाचार घेतला. दरेकर म्हणाले की, राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती आताच निर्माण झालेली आहे. कारण मंत्री जेलमध्ये आहेत. शेतकरी, एसटी कर्मचारी, वीज प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र, आमचा तसा डाव असता, तर आम्ही या पूर्वीच राष्ट्रपती राजवट लावली असती. राष्ट्रपती राजवटीसारखी परिस्थिती निर्माण झाली, तर केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लावत असते, पण पक्षीय द्वेषातून आणि सूड भावनेतून राष्ट्रपती राजवट लागत नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.