नाशिक : मालेगावातील भाजपचे युवा नेते अद्वय हिरे (Advay Hiray) यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी दिल्याची बातमी ताजी असताना एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) हे हिरे कुटुंबियांची भेट घेणार आहेत. अद्वय हिरे हे शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गटात (Thackeray Group) जाणार असल्याचं निश्चित झालंय. त्यानंतर आता सत्यजित तांबे हिरे कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे आपण अद्वय हिरे यांनादेखील भेटणार असल्याचं विधान स्वत: सत्यजित तांबे यांनी केलं आहे. त्यामुळे विधान परिषदेवरुन सुरु असलेलं राजकारण आणखी कुठपर्यंत जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज सत्यजित तांबे यांनी मालेगावात कार्यकर्ते व मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांनी पीडीएफचे जिल्हाध्यक्ष आर डी निकम यांचीही भेट घेतली. मालेगावात हिरे कुटुंबियांची मोठी ताकद असल्याने हिरे कुटुंबीयांची देखील भेट घेणार असल्याचे तांबे यांनी सांगितलं.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या 30 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यानंतर 2 फेब्रुवारीला मतदानाचा निकाल समोर येणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमधील महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे.
शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या या रणधुमाळीत नाशिकची जागा सर्वाधिक चर्चेची ठरलीय. कारण काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. याउलट त्यांनी पक्षाला अंधारात ठेवून आपल्या मुलाला पाठिंबा दिला. या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरलाय.
विशेष म्हणजे भाजपने नाशिकमध्ये अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे ही भाजपची राजकीय खेळी असल्याचं मानलं जात आहे. सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे काँग्रेस पक्षात खळबळ उडाली. काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर थेट निलंबनाची कारवाई केलीय. या कारवाईवर सध्या तरी तांबे प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीयत.
दुसरीकडे महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिलाय. शुभांगी यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्या ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटकपक्षांसोबत चर्चा करण्यात आली. अखेर शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला.
नाशिकमध्ये सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत आहे. या निवडणुकीत जिंकून येण्यासाठी दोन्ही उमेदवारांकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.