नाशिक : नाशिक (Nashik) शहरात पहिल्याच पावसानंतर रस्त्यांचे तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे. शहरातील रस्त्यांचे चाळण झाली असून मोठं मोठे खड्डे रस्त्यावर बघायला मिळतात. इतकेच नाही तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्येही मोठी वाढ झालीयं. तीन वर्षांपूर्वीच महापालिकेने (Municipality) कोट्यावधी रूपये खर्च करून जे रस्ते तयार केले होते, त्या रस्त्यांची देखील दुरावस्था झालीयं. महापालिका आयुक्तांनी देखील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, आता गणेशोत्सवामध्ये नाशिकच्या खराब रस्त्यांवरून एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन (Organized) करण्यात आलयं.
पावसाळा असला की एक विषय सातत्याने गाजत असतो, तो म्हणजे रस्त्यांवरील खड्डे. या खड्डयांवर प्रशासनाने कायमस्वरूपी किंवा तात्पुरते काही उपाय केले तरी काही काळानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. रस्त्यांवरील खड्डे त्यावरून वाहन चालवताना होणारा त्रास, घडणारे अपघात आणि परिणामी गमवावा लागणार जीव यावर नेहमीच शहरात चर्चा केली जाते. आयुक्त कारवाईचे आदेश देतात किंवा फार झाले तर रस्यांची पाहणी करतात. मात्र, नाशिक शहरातील रस्त्यावरील खड्डे काही कमी होत नाहीत.
या सर्व गोष्टींमुळे रस्त्यांवरील खड्डे हा विषय तितकाच महत्त्वाचा आणि चर्चेचा आहे. या खड्ड्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी. खड्डेमुक्त नाशिक व्हावे, यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक शहराच्या वतीने एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आलीयं. गणेशोत्सवाच्या कालावधीत जे गणेश मंडळ खड्ड्यांच्या विषयी देखावे सादर करतील, त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे.
शहरातील नागरिकांनी खड्ड्यांचा फोटो समर्पक शीर्षकासह पाठवावा, असे आवाहन करण्यात आलंय. यातील उत्कृष्ट फोटोला बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच या फोटोंचे प्रदर्शन देखील भरविण्यात येणार आहे. शहरातील खड्ड्यांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती वाढावी, यासाठी एक लाख सह्यांची मोहीम देखील राबवली जाणार आहे, अशी माहिती नेते राजू देसले यांनी दिलीयं.