नाशिक : दोघांनाही आपण समर्थपणे कारभार करू शकतो असा आत्मविश्वास असावा, म्हणूनच मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य सरकारला लगावला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. सध्या राज्यात मंत्रिमंडळ नसून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असे दोघेच कारभार पाहत आहेत. राज्यात पूरपरिस्थिती (Flood situation) असून अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. अशा स्थितीत मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत. त्यामुळे मदत आणि इतर कार्ये करण्यात मर्यादा येत आहेत. अशावेळी विरोधी पक्षांकडून मंत्रिमंडळ (Cabinet expansion) कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शिंदे आणि फडणवीस यांना हा टोला लगावला आहे.
राज्य सरकारकडून अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली जात आहे. त्यावर पवार म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारकडून विविध प्रकल्पांना मान्यता घेण्यात आली होती. त्याचे टेंडर काढलेले होते. कामे सुरू असताना अशावेळी कोणत्याही प्रकल्पांना स्थगिती देणे योग्य नाही. अनेक प्रकल्पात त्रुटी असल्याचे कारण पुढे करत सुडाच्या भावनेने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय तसेच प्रकल्पांना स्थगिती शिंदे-फडणवीस यांच्याकडून दिली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी कुठे दौरा काढावा, हा त्यांचा निर्णय आहे, अशी टीका शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. मात्र मुख्यमंत्री केवळ आपल्या गटातील आमदारांच्याच मतदारसंघात दौरे काढत असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. त्यावर पवारांनी आपले मत व्यक्त केले. ते दौरे काढत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. विरोधी पक्षांनी जेथे नुकसान झाले तेथेच दौरे काढले. त्यामुळे याच्यातून ज्याने-त्याने बोध घ्यावा, असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. याचवेळी एकूण परिस्थिती चिंताजनक असल्याचेही शरद पवार म्हणाले.