नाशिक: राजापूर येथे पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या झाली. त्या आधी औरंगाबाद येथे आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. तर काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत. या हल्ल्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृहखात्यावरच बोट ठेवलं आहे. फडणवीस आपल्या खात्याकडे लक्ष देत आहेत की नाही याबाबत शंका असल्याचं मोठं विधान शरद पवार यांनी केलं आहे.
शरद पवार हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. राज्यात आठवडाभरात हल्ल्याचे पाच सात गुन्हे घडले आहेत. हे चांगलं नाही. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था नेहमी चांगली असते.
पण हल्ली ज्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे ते कितपत लक्ष देतात ही शंका निर्माण होत आहे. दररोज काही ना काही ऐकायला मिळत आहे. हल्ला आणि हत्येच्या बातम्या ऐकायला मिळतात. रस्त्यावरचे अपघातही महाराष्ट्रात वाढले आहेत. ही चिंतेची बाब आहे, असं शरद पवार म्हणाले.
आता कोकणात एका पत्रकाराची हत्या झाल्याचं कळलं. पत्रकारांची ही अवस्था झाली. याचा अर्थ राज्य कोणत्या दिशेने चाललंय हे समजून घ्यावं लागेल, असं पवार म्हणाले.
औरंगजेब नसता तर शिवाजी महाराजांचा इतिहास कळला नसता असं विधान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. आव्हाड यांच्या या विधानाचं त्यांनी समर्थन केलं. आव्हाड यांच्या विधानात आक्षेपार्ह काही नव्हतं. शिवाजी महाराजांचं शौर्य समोर आलं नसतं एवढंच त्यांना म्हणायचं होतं. हाच त्यातील मुद्दा आहे, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येवरून गंभीर आरोप केले आहेत. आर्थिक कारणातून वारिसे यांची हत्या झाली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडीत सभा घेतली.
रिफायनरी आणणारच. कोण आडवा येतो ते पाहू, असा इशारा फडणवीस यांनी दिला होता. फडणवीस यांच्या या इशाऱ्यानंतर 24 तासात आडवे येणाऱ्या वारिसेंची हत्या झाली, असा आरोप संजय राऊत यांनी केला.