‘राष्ट्रवादीच्या पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा द्या’, अजित पवार गटाने समीर भुजबळांचा राजीनामा मागितला?

| Updated on: Oct 22, 2024 | 7:21 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाच्या पक्षश्रेष्ठींनी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मागितला आहे.

राष्ट्रवादीच्या पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा द्या, अजित पवार गटाने समीर भुजबळांचा राजीनामा मागितला?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून पक्षश्रेष्ठींनी राजीनामा मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षश्रेष्ठींनी समीर भुजबळ यांच्याकडे मुंबई अध्यक्षपद आणि सदस्यत्वचा राजीनामा मागितला आहे. समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. असं असताना आता अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी समीर भुजबळ यांच्याकडे राजीनामा मागितल्याची माहिती आहे. समीर भुजबळ हे मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत. त्यामुळे समीर भुजबळ यांनी शरद पवार गटात प्रवेश करुन नांदगावमधून निवडणूक लढवली तर नाशिकच्या राजकारणात काका-पुतणे यांच्यातच राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे.

समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांनी काही दिवसांपासून नांदगावमध्ये कामालादेखील सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांच्याबाबात सूचक वक्तव्य केलं होतं. “समीर, पंकज आता तुम्ही मोठे झालात. तुमचे निर्णय स्वत: घ्यायला शिका”, असा सल्ला मंत्री छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना उघडपणे दिला होता. त्यांच्या या सल्ल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती.

महायुतीकडून सुहास कांदे यांची उमेदवारी निश्चित

याआधी आमदार पंकज भुजबळ हे नांदगावमध्ये उमेदवारीसाठी तयारी करत असल्याची चर्चा होती. पण त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. यानंतर समीर भुजबळ हे नांदगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली होती. पण नांदगाव मतदारसंघ हा महायुतीत शिवसेनेच्या वाटेला जातो. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे हे नांदगावचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीकडून सुहास कांदे यांची उमेदवारी निश्चित आहे.

महायुतीत एकाच मतदारसंघातून दोन उमेदवार दिले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे महायुतीमधील अजित पवार गटाचे आमदार समीर भुजबळ यांना उमेदवारी मिळणं कठीण आहे. त्यामुळे ते शरद पवार गटात प्रवेश करुन उमेदवारी मिळवणार असल्याची चर्चा होती. समीर भुजबळ हे नांदगावमध्ये प्रचंड सक्रीय झाले असून ते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची देखील चर्चा आहे. या सर्व चर्चांनंतर आता अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी समीर भुजबळ यांचा पक्षाच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.