नाशिकः रिक्षा, वडाप, टमटमचे धक्के खावून मेटाकुटीला आलेल्या खेड्यापाड्यातल्या आणि लक्झरीचे अव्वाच्या सव्वा भाडे देऊन जेरीस झालेल्या शहरातल्या नागरिकांसाठी एक खूशखबर. होय, तुमची हक्काची एसटी आता रुळावर आली असून उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक (Nashik) विभागात सध्या सत्तर टक्के म्हणजेच जवळपास 3738 संपकरी एसटी कर्मचारी (ST Employees) कामावर रुजू झालेत. त्यात मालेगाव आगारात तर 95 टक्के कर्मचारी कामावर आल्याने एसटी सुरळीत सुरू झाली आहे. विभागात आता फक्त 952 कर्मचारी कामावर यायचे राहिलेत. ते 30 एप्रिलपर्यंत रुजू होतील, असा अंदाज व्यक्त होतोय. जळगाव (Jalgaon) विभागातही एकूण 70 टक्के कर्मचारी कामावर हजर झालेत. मात्र, सहा महिन्यांपासून एसटी बसेस जागेवरच असल्याने त्यांची देखभाल-दुरुस्तीची कामे रखडली आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना काम मिळणे अवघड झाले आहे. दुसरीकडे तिकीट वेंडिंग मशीन उपलब्ध नसल्याने चालक आणि वाहकांना ड्युटी मिळत नसल्याची स्थिती आहे.
एसटी संप आणि कोरोनाच्या प्रकोपामुळे नाशिक जिल्ह्यात एसटी सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे सध्या शिवशाही, निमआराम, साध्या अशा 710 बस विभागात सुरू आहेत. आवर्तन पद्धतीने यातील 300 बस सध्या सेवेत आहेत. शिवाय 70 टक्के मनुष्यबळ आहे. मात्र, संपामुळे यांचे जवळपास सहा काम बंद होते. आता या कर्मचाऱ्यांना दोन दिवस प्रशिक्षण दिल्यानंतर कामावर रुजू करून घेण्यात येत आहे. तसे एसटी महामंडळाचे नियोजन सुरू असून, एप्रिल अखेरपर्यंत बससेवा पुन्हा पूर्ववत होण्याची आशा व्यक्त होतेय.
नाशिक जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 13 डेपोंची वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करावे आणि त्यांना सहावा-सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीवर कर्मचारी ठाम संपावर ठाम होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर ते कामावर परतत आहेत. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलीय. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना सेवेत घ्यावे, त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होतेय. गेले सहा महिने एसटी सेवा बंद राहिल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. खासगी वाहतूकदारांनी प्रवासाचे दर दुप्पट केले आहेत. त्यामुळे नागरिकांची आर्थिक लूट झाली. या दुष्टचक्रातून आता दिलासा मिळणार आहे.