नाशिक : शेतकऱ्यासमोरची आव्हानं केवळ शेतात काबाड कष्ट करुन संपत नाही. हा माल शेतातून काढून कृषी बाजारापर्यंत नेण्याचंही मोठं काम शेतकऱ्याच्याच माथी असतं. मात्र ही माल वाहतूक करताना अनेकदा अपघातांनाही सामोरं जावं लागतं. नाशिकमधील सिन्नरमध्ये अशीच एक घटना पाहायला मिळाली. सिन्नरच्या डुबेरवाडी येथे टोमॅटो घेऊन जाणारा पिकअप पलटी होता-होता वाचला. या अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत.
सिन्नर तालुक्यातील डुबेरेवाडी येथे एक शेतकरी शेतातून टोमॅटोचे कॅरेट भरुन नेत होता. पिकअप हे कॅरेट घेऊन गावातून महामार्गावर येत असतानाच रस्त्यावरील चढाला पिकअपचे पुढील दोन्ही चाकं वरती झाले. त्यामुळे ही पिकअप पलटी होते की काय अशी स्थिती तयार झाली. मात्र, वाहनचालकाने प्रसंगावधान राखत गाडी बंद केली. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडी पलटी होण्यापासून रोखलं आणि चालकालाही सुखरुप गाडी बाहेर काढून वाचवलं.
VIDEO: सिन्नरमध्ये टोमॅटो घेऊन जाणारा पिकअप पलटी होता होता थोडक्यात वाचला
शेतकऱ्यासमोर विपरित नैसर्गिक परिस्थितीत काबाड कष्ट करुन पिक उभं करणं हेच एक आव्हान नाही, तर तो माल शेतातून बाजारपेठेत नेणं आणि तिथंही योग्य दरासाठी संघर्ष करण्याचंही आहे.#Farmer #Farming #Sinnar #म #मराठी pic.twitter.com/1J3S1xqqIz
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) September 3, 2021
पिकअप टोमॅटोच्या वजनाने ओव्हरलोड झाल्यानं असं घडल्याचं सांगण्यात आलंय. आधीच टोमॅटोचे दर कोसळले आहेत. त्यातच किमान शेतात कष्ट करुन पिकवलेले टोमॅटो बाजारात नेऊन खर्च तरी निघेल या आशेने शेतकरी टोमॅटो बाजारात नेत आहेत. मात्र, त्यातच अशा घटनांनी शेतकऱ्याच्या अडचणींमध्ये वाढच होतेय.