नाशिक – राज्य सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) रस्ते , वाड्या आणि वस्तूंची जातीवाचक नावं हद्दपार करण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने (Department of Social Welfare) नुकताच घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्याचबरोबर नाशिक (nashik) विभागातील तृतीयपंथीयांना मानधन देण्याचा विचार असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले आहे. विभागीय आयुक्तांची विभागीय दक्षता व नियंत्रण समितीसोबत एक बैठक झाली. त्यावेळी जातीवाचक नावं हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक विभागात तात्काळ निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. विशेष म्हणजे 1659 जातीवाचक रस्ते, वाडया, वस्त्यांची नावे बदलण्यात आली.
तृतीयपंथीयांबाबत जनजागृती करण्यात आली
बैठकीत नाशिक विभागातील शहरी क्षेत्रातील 190 जातीवाचक नावे तात्काळ बदलण्यात आली. तर ग्रामीण भागातील 1459 जातीवाचक नावे बदलण्यात आली आहेत. शहरी विभागातील नावे बदलण्याचा आदेश संबंधित यंत्रणांना दिला आहे. घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत तृतीयपंथीयांबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर तृतीयपंथी कल्याण व त्यांच्या हक्काचे संरक्षण कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले आहे.
3 हजार मानधन देण्याचा निर्णय घेतला
तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करायला पाहिजे. पुणे महानगरपालिका प्रशासनाने तृतीयपंथीयांना 3 हजार रूपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचधर्तीवर विभागीय आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. विभागीय समितीच्या सदस्य शमिभा पाटील यांनी तृतीयपंथीयांना येणा-या अडचणी व सामाजिक प्रश्नाबाबत बैठकीत माहिती सांगितली. नाशिक विभागात सध्या 603 तृतीयपंथीयांची संख्या आहे. त्यापैकी 363 तृतीयपंथीयांचं कोविड लसीकरण पूर्ण झालं आहे.