नाशिक : नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार (Nashik Rain) पावसामुळे विविध मंदिरे गोदावरी नदीखाली बुडाली आहेत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 6 ते 7 जुलैपासून पुढचे काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) विविध जिल्ह्यांत सध्या मुसळधार नंतर संततधार सुरू आहे. या पावसाचा परिणाम आता पुराच्या स्वरुपात दिसून येत आहे. समोर आलेल्या व्हिडिओंमधून या पावसाचे रौद्र रूपही दिसत आहे. दोन दिवसांपासूनच्या संततधारेमुळे नार नदीला पूर (Flood) आला असून रात्री सुरगाणा-पेठ महामार्गावरील उंबरदे पळसन पूल पाण्याखाली गेला आहे. पंचेचाळीस वर्षापूर्वीचा दगडी पूल आता धोकादायक बनला आहे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन पुलावरून प्रवास करावा लागत आहे.
#WATCH | Maharashtra: Various temples submerge under the Godavari river in Nashik, due to incessant rain for the past three days pic.twitter.com/AvAr7JYoYE
— ANI (@ANI) July 11, 2022
हे सुद्धा वाचा
सुरगण्याच्या सात ते आठ नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पावसामुळे भात लावणीची कामे रखडली आहेत. पाऊस कमी झाल्यावर भात लागणीला वेग येणार आहे. जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून त्यामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. देवळा तालुक्यातील सावकी-विठेवाडी गावादरम्यान असणारा गिरणापूल पाण्याखाली गेला असून या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.
मंगळवार (12 जुलै)पर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र तसे गुजरातच्या अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. याविषयी हवामान विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चणकापूर आणि पुनंद धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले वाहू लागले आहे. चणकापूर धरणातून आज सकाळी सहा वाजता 268 क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रात सोडण्यात आला. त्यामुळे गिरणानदीला पूर आला. प्रशासनाने गिरणानदी काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. देवळा-तालुक्यातील सावकी-विठेवाडी गावादरम्यान असणाऱ्या गिरणापुलावरून पाणी वाहत असल्याने पुलाचा नागरिकांनी वापर करू नये, असे आवाहन देवळा तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.