मनुस्मृतीचे श्लोक शालेय अभ्यासक्रमात समावेशावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. मनुस्मृतीने स्त्रीया आणि शोषित समाजाला कुठलाही अधिकार दिला नाही, अशी भूमिका पुरोगाम्यांनी आणि बहुजनवाद्यांची आहे. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी पण त्यांची सडेतोड भूमिका जाहीर केली आहे. मनुस्मृतीला विरोध करणारच असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडणार का? अशी चर्चा रंगली आहे.
दरेकरांच्या भूमिकेविषयी मत
भाजप नेते प्रविण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड याप्रकरणात नौटंकी करत असल्याचा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनुस्मृतीसंदर्भात भूमिका मांडली आहे. असा कोणत्याही प्रकारचा समावेश केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे दरेकर म्हणाले. प्रवीण दरेकरांच्या भुमिकेबाबत भुजबळांनी तो त्यांचा प्रश्न असल्याचे सांगितले.
मनुस्मृतीचा चंचू प्रवेश सुद्धा नको
माझा मुद्दा मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये, असा असल्याचे भुजबळ म्हणाले. जितेंद्र आव्हाड विरोधक, त्यांचा विरोध निश्चित करा, आमचं काही म्हणणं नाही. मनुस्मृती जाळा, जी बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली होती. आमची भूमिका फुले शाहू आंबेडकरांची आहे, असे भुजबळांनी जाहीर केले.
मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका घेणार
समता परिषद आणि आपली मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका असल्याचे भुजबळ म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून महाड येथील चवदार तळ्यावर चूक झाली आहे का, या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. त्यांच्याकडून चूक झाली तर आम्ही सांगू झाली चूक म्हणून. ते मुंबईवरून महाडला गेले मात्र त्यांची भूमिका तिथे जाऊन मनुस्मृती जाळणे होती. त्यांचं चुकलं, त्यांना काही शिक्षा करायची ती करा. माझे काहीही म्हणणे नाही. तुम्हाला अधिकार केव्हा येईल जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल तेव्हा, असे ते म्हणाले.
मी नाराज नाही
तुम्ही या सर्व प्रकरणामुळे नाराज आहात काय, सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे नाराज आहात काय, असे त्यांना विचारले असता. मी नाराज नाही. मी शाहू फुले आंबेडकर समता परिषदेचा पाईक आहे. मी अशा प्रश्नांवर स्पष्टपणे बोलतो, खोटं बोलणे मला जमत नाही.विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही. मी लोकसभा सोडली असे उत्तर त्यांनी दिले.
स्त्रीयांना कुठलाच अधिकार नाही
आज अहिल्यादेवींना अभिवादन करणे पहिले काम आहे. मनुस्मृतीमध्ये लिहिलेले आहे की स्त्रियांना कुठलाच अधिकार नाही.शिक्षणाचा अधिकार नाही. मनुस्मृतीला बाजूला ठेवून अहिल्यादेवी होळकर, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांना आठवले पाहिजे.मनुस्मृतीत महिलांना कोणताही अधिकार नाही. मनुस्मृतीला बाजूला ठेवूनअहिल्यादेवी होळकर, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांनी काम केल्याचे भुजबळ म्हणाले.