नवी दिल्ली : 20 नोव्हेंबर 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. राष्ट्रवीद पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह नेमकं कुणाचं याबाबत आज महत्वाची सुनावणी होणार आहे. दिल्लीत आज संध्याकाळी 4 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे. सलग तीन दिवस ही सुनावणी चालेल. मागच्या सुनावणीवेळी शरद पवार यांच्या गटाकडून युक्तिवादावेळी अजित पवार गटावर बोगस प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला होता. अजित पवार गटाचा युक्तिवाद आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे आज शरद पवार गटाकडून युक्तिवाद होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
राष्ट्रवादी पक्षाबाबत आज महत्वाची सुनावणी होत असताना या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हजर राहणार आहेत. त्यासाठी शरद पवार पुण्याहून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. या सुनावणीला शरद पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहेत.
शेवटची सुनावणी 9 नोव्हेंबरला झाली होती. या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाने बोगस कागदपत्र सादर केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे अजित पवार गटावर 420 कलमा अंतर्गत कारवाईची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली. शरद पवार गटाचा दावा आहे की, अजित पवार गटाने मृत व्यक्ती, अल्पवयीन मुले, गृहणी, झोमॅटो डिलिव्हरी बॉय, सेल्स मॅनेजर अशा लोकांची प्रतिज्ञापत्रं निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत.
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार हे भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजपला पाठिंबा दिला. या नेत्यांनी युती सरकारमध्ये जात मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर काहीच दिवसात अजित पवार गटाने शिंदे गटाप्रमाणे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा सांगितला. त्यानंतर आता या प्रकरणी निवडणूक आयोगात सुनावणी होत आहे. या सुनावणीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
अजित पवार गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पवार कुटुंबात उभी फूट पडली, अशी चर्चा राज्यभर झाली. मात्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंब एक असल्याचं वारंवार सांगितलं. नुकत्याच झालेल्या दिवाळीत ते दिसलंही. या दिवाळीत पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.