नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची आग्रही मागणी, रायगड ते नवी मुंबई मानवी साखळी

| Updated on: Jun 09, 2021 | 10:43 PM

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव देण्यात यावं या मागणीसाठी गुरुवारी, 10 जून रोजी सकाळी 10 वा. रायगड ते अगदी मुंबईपर्यंत मानवी साखळी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची आग्रही मागणी, रायगड ते नवी मुंबई मानवी साखळी
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी आंदोलन
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरुन आता राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्त आग्रही आहेत. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दि. बा. पाटील यांचंच नाव देण्यात यावं या मागणीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्यानं गुरुवारी, 10 जून रोजी सकाळी 10 वा. रायगड ते अगदी मुंबईपर्यंत मानवी साखळी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. (Agitations for naming Navi Mumbai Airport after DB Patil)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून होणाऱ्या या आंदोलनाला रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघरमधील अनेक संघटनांनी, वारकरी संप्रदायाने पाठिंबा दिला आहे. कृती समितीचे पदाधिकारी, तसंच पाठिंबा दिलेल्या संघटना, वारकरी सांप्रदाय, विविध पक्षातील कार्यकर्ते, संस्था संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते असे किमान 35 हजार नागरिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत, असा दावा करण्यात आलाय. मानवी साखळी आंदोलनासाठी तशी तयारीही जिल्हा व विभागनिहाय करण्यात आली आहे.

दि. बा. पाटलांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्त आग्रही

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता आणि राजकीय पक्षाचे नेते करीत आले आहेत. कारण दि. बा. पाटील यांची नवी मुंबई ही कर्मभूमी आहे. इथल्या भूमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संबंध आयुष्य वेचलं आहे. 1984 साली शेतकऱ्यांच्या जमितीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आणि देशभर गाजलेल्या लढ्यातून शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसित जमीन देण्याचे तत्त्व जे प्रस्थापित झाले ते पुढे संबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू झाले. त्यामुळे दि. बा. पाटील हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते मानले जातात

दि. बा. पाटील यांचंच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त सरसावलेले पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गावात, रस्त्यावर ठीकठिकाणी त्यांच्या नावाचे बॅनर लावण्यात आले आहेत. कोळी बांधवांकडून वाशी खाडीमध्ये होडीवर बॅनरबाजी करण्यात आली.

दि. बा. पाटलांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्त आग्रही का?

पाचवेळा आमदार, दोन वेळा खासदार, विरोधी पक्षनेते, नगराध्यक्ष अशी दि. बा. पाटील यांची कारकिर्द राहिली आहे. त्यांनी आमदार आणि खासदार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यानंतर ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा प्रश्न अशा अनेक लढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेऊन तुरुंगवासही भोगला. त्यामुळे त्यांचं कार्य नव्या पिढीला स्फूर्तिदायी ठरावं यासाठी त्यांच्या कर्मभूमीत त्यांची स्मृती जागरूक राहावी म्हणून नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाला त्यांचंच नाव द्यावं, अशी मागणी होत आहे.

संबंधित बातम्या :

नवी मुंबई विमानतळासाठी महाविकासआघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम; तर 18 गावांचा दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद चिघळणार, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर शिवसेनेची बॅनरबाजी

Agitations for naming Navi Mumbai Airport after DB Patil