नवी मुंबई: घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस बेकायदेशीररीत्या व असुरक्षितरित्या नोझल पाईपद्वारे रिकाम्या सिलेंडरमध्ये भरणार रॅकेट उघडकीस आले आहे. गॅस सिलेंडरची बाजारात विक्री करुन ग्राहकांची तसेच शासनाची फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला सानपाडा पोलिसांनी सोमवारी रात्री रंगेहाथ अटक केली आहे. मनोज सोनाराम बिष्णोई (21), मनोज हनुमानराम बिष्णोई (22) आणि रामस्वरुप जगदिशराम बिष्णोई (21) अशी या त्रिकुटांची नावे आहेत. या तिघांनी व पळून गेलेल्या त्यांच्या इतर दोघा साथिदारांनी मागील अनेक महिन्यांपासून सिलेंडरमधील गॅस चोरुन तो विकला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाईत पोलिसांनी घरगुती वापराचे भरलेले 15, रिकामे 8 व अर्धवट भरलेले 2 असे एकूण 25 गॅस सिलेंडर, नोझल पाईप व महिंद्रा मेक्सिमो टेम्पो असा मुद्देमाल जप्त केला आहे.(Navi Mumbai Gas Cylinder theft racket exposed three arrested by Police)
या प्रकरणात अटक करण्यात आलेले तिघे तसेच पळून गेलेले इतर दोघे हे सर्व मुळचे राजस्थान राज्यातील आहेत. ते सानपाडा सेक्टर-5 मधील भारत गॅस कंपनीच्या एक्सेल भारत गॅस एजन्सीत डीलीव्हरी बॉय म्हणून कामाला होते. गॅस सिलेंडरची सर्व जबाबदारी त्यांच्यावर असल्याने हे सर्वजण ग्राहकांना वितरीत करण्यासाठी येणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडर मधील 2 ते 3 किलो एलपीजी गॅस, नोझल पाईपच्या सहाय्याने रिकाम्या सिलेंडरमध्ये भरुन नंतर सदर गॅस सिलेंडर गैरमार्गाने विकत होते. त्यानंतर ज्या घरगुती सिलेंडरमधील गॅस चोरले जात होते, त्या गॅस सिलेंडरला डुफ्लिकेट सिल लावून सदर सिलेंडर देखील ते घरगुती ग्राहकांना देत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून या सर्वांचा गॅस चोरीचा हा धंदा सुरु होता.
सोमवारी रात्री देखील हे पाच जण सानपाडा सेक्टर-5 मधील मराठी शाळेच्या समोर सानपाडा गाव येथे महिंद्रा मेक्सिमो कंपनीचा छोटा टेम्पो उभा करुन त्यात असलेल्या घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस, नोझल पाईपच्या सहाय्याने चोरुन रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीरीत्या व असुरक्षितरित्या भरत होते. सानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक भाऊसाहेब होलगीर हे त्यावेळी आपली ड्युटी संपवून त्याठिकाणावरुन घरी जात असताना, त्यांना गॅस गळती होत असल्याचा वास आल्याने त्यांनी त्या भागात संशयितरित्या उभ्या असलेल्या टेम्पोच्या पाठीमागे जाऊन पाहणी केली. यावेळी सदर ठिकाणी गॅसची चोरी करण्यात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे होलगीर यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबतची माहिती दिल्यांनतर काही वेळातच त्याठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपुत, पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ माने व त्यांच्या पथकाने छापा मारला.
गॅस सिलेंडरची डिलेव्हरी करणारे पाचही जण 14.2 किलोच्या सिलेंडरमधील गॅस दुसऱ्या सिलेंडरमध्ये नोझलच्या सहाय्याने भरताना रंगेहाथ सापडले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन डिलीव्हरी बॉय मांगीलाल बिष्णोई व चालक मनफुल बिष्णोई हे दोघे पळून गेले. त्यामुळे पोलिसांनी मनोज बिष्णोई, रामस्वरुप बिष्णोई, तसेच मनोज बिष्णोई या तिघांना ताब्यात घेऊन त्याठिकाणी असलेल्या टेम्पोसह 14.2 किलो वजनाचे भरलेले 15,रिकामे 8 व अर्धवट भरलेले 2 असे एकुण 25 घरगुती गॅस सिलेंडर तसेच ज्या नोझल पाईपच्या सहाय्याने ते गॅसची चोरी करत होते, तो नोझल पाईप, टेम्पो व इतर साहित्य जप्त केले. या सर्वांवर फसवणुकीसह जीवनावश्यक वस्तु अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या पाचही जणांनी मागील अनेक महिन्यांपासून गॅस चोरीचा धंदा सुरु केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्वांची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष निकम यांनी दिली.
संबंधित बातम्या
नाईट ड्युटीवर जाण्यास मनाई केल्याने शिवीगाळ, संतापलेल्या तिघांकडून चाकूने वार
नवरदेवाला हळद लागताना घरात तिघांवर हल्ला, कल्याणमध्ये थरार, महिलेचा मृत्यू
( Navi Mumbai Gas Cylinder theft racket exposed three arrested by Police)