नवी मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. मुंबईसह नवी मुंबईत तर कोरोनाने थैमान घातले आहे. नवी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात आज तब्बल 1 हजार 72 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या ही 3404 वर पोहचली आहे, तर आज दिवसभरात 47 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे आज कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
राज्यात पुन्हा एकदा सक्रीय रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र तरी देखील नागरिक कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसतून येत आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेले ग्राहक तसेच व्यापारी सरार्सपणे कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. गर्दी कायम असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहेत. तसेच खरेदीसाठी येणारे अनेक ग्राहक मास्कचा देखील वापर करत नाहीत. यामुळे कोरोनाचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
दरम्यान नवी मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असल्याने महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्यविभागाच्या वतीने विविध योजनांची आखणी करण्यात येत आहे. एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत कोरोनाबाधितांसाठी 1500 बेड आरक्षीत करण्यात आले आहेत. कोरोना नियंत्रणासाठी टास्क फोर्सची देखील निर्मिती करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्याकडून आगामी 10 दिवसांमधील कार्यक्रम रद्द, सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना