नवी मुंबई : प्रसिद्ध निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी हजारो लोक उपस्थित होते. प्रचंड रणरणतं ऊन असूनही पुरस्कार सोहळ्यसाठी लोक मैदानात बसून होते. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या हजारो जनसमुदायाला संबोधित केलं. वयाच्या 76व्या वर्षीही आप्पासाहेबांनी तडाखेबंद भाषण केलं. नानासाहेब धर्माधिकारी यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मानव सेवेचं कार्य केलं. मीही शेवटच्या श्वासापर्यंत मानवतेची सेवा करणार आहे. माझा मुलगाही तेच कार्य पुढे नेणार आहे, असं आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले.
खारघरच्या कार्पोरेट पार्क मैदानावर हा सोहळा पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 25 लाखांचा धनादेश, श्रीफळ, शाल आणि मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यापूर्वी आप्पासाहेब यांना देण्यात आलेलं मानपत्रं वाचून दाखवण्यात आलं. नंतर त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी एक फिल्म दाखवण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, शंभुराज देसाई यांच्यासह राज्यमंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदार उपस्थित होते. या सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो श्रीसेवक उपस्थित होते. प्रचंड जनसमुदाय या सोहळ्यासाठी लोटला होता. त्यानंतर आप्पासाहेबांनी श्रीसेवकांशी संवाद साधला.
आमच्या कार्याची सुरुवात आम्ही खेडेगावातून केली. अनेकांनी सांगितलं तुम्ही शहरातून सुरुवात करा. पण खेड्यात अंधश्रद्धा होती. त्या लोकांना त्यातून बाहेर काढण्याची गरज होती. म्हणून खेडेगावातून सुरुवात केली. आम्ही प्रसिद्धी कधी केली नाही. प्रसिद्धीपासून मी लांब राहतो. काम करायचं आहे तर जाहिरात करण्याची गरज काय? मानवता धर्म हा श्रेष्ठ आहे. प्रत्येकाने अंत:करणात त्याची खूणगाठ बांधा. नानासाहेब या मानवता धर्मासाठी कार्यरत होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी हे काम पुढे नेले. मीही हे मानवतेचं काम मीही शेवटच्या श्वासापर्यंत करणार आहे. माझ्यानंतर माझा मुलगा हे कार्य पुढे नेणार आहे. कार्य हे सर्व श्रेष्ठ आहे, असं आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले.
समाज सेवा ही सर्व श्रेष्ठ सेवा आहे. त्याला तोड नाही. हे कार्य करण्यासाठी आयुष्य कमी पडणारं आहे. समाजसेवेचं कार्य कधीच पूर्ण होणारं नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ्या गोष्टी करता येतात. प्रत्येकाने झाडं लावा. प्रत्येकाने पाच झाडे लावा. पाऊस पडल्यावर झाडे लावा. झाडांचे प्रचंड महत्त्व आहे. त्या झाडांना रोज पाणी घाला. लहान मुलांची आपण सेवा करतो, तशीच वृक्षाची सेवा करा. रक्तदान करा, सर्व प्रकारचे दाखले असतात, दाखले देण्यासाठी यंत्रणा आहे. हे दाखले मिळवा. इतरांना मिळवून देण्यात मदत करा. पाणपोया आपण बांधल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना श्रवण यंत्रं द्या, सरकारी योजनांची माहिती द्या, असं आवाहन त्यांनी केलं.