नवी मुंबई : अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार १६ एप्रिल रोजी देण्यात येणार आहे. खारघरमधील मैदानात हा पुरस्कार केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. शनिवारपासून श्री सेवक येण्यास सुरुवात झाली. अप्पासाहेब यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. ते विश्वाची चिंता वाहतात. लाखो सदस्यांचा उपासनेतून मार्ग निघतो. तो आनंदसोहळा साजरा करण्यासाठी आलो असल्याचं खारघर येथे आलेल्या जळगावच्या सेविकेने सांगितले.
सोलापूरातून आलेले सेवक म्हणाले, खारघरमध्ये कधी येणार याचे नियोजन झाले होते. हा खूप मोठा आनंद आहे. असा आनंद कधी मिळू शकणार नाही. अप्पासासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दल सेवक अशी मोठी भावना ठेवतात. त्या अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊया.
मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य शासनाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. तो अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे. या सोहळ्याला सुमारे २० लाख श्री सदस्य उपस्थित राहतील.
डॉ. दत्तात्रय धर्माधिकारी यांचा जन्म १५ मे १९४६ रोजी झाला. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. भजन, कीर्तन, अध्यात्माची आवड त्यांनी लहानपणापासून होती. त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांचा वसा ते वाहून नेत आहेत.
समाजाच्या सेवेसाठी अप्पासाहेब यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. गेली ३० वर्षे ते निरुपण करत आहेत. बालमनावर संस्कार करत असतात. त्यासाठी त्यांनी बालसंस्कार बैठकी घेतल्या. त्यातून बालकांवर चांगले संस्कार केले. नव्या पिढीला मार्गदर्शन केले. त्यातून चांगली समाजनिर्मिती झाली.
आदिवासी पाड्या, वस्त्या या ठिकाणी त्यांनी व्यसनमुक्तीचे कार्य केले. निर्माल्यातून खत निर्मिती केली. त्यातून पर्यावरण पुरक संदेश त्यांनी समाजाला दिला. अप्पासाहेब हे स्वच्छतादूत म्हणून ओळखले जातात. वडील नानासाहेब यांचे कार्य ते जोमाने करत आहेत.